
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावातील सर्प तथा प्राणीमित्र ओंकार उर्फ ओमी गावडे यांनी शेतकरी घोगळे यांच्या बागेत जखमी अवस्थेत आढळलेला बहिरी ससाणा आणि नाग यांना आज वनविभागाच्या ताब्यात देऊन त्यांना जीवदान दिले आहे.
नेमळे येथील पेशाने शिक्षक असलेले शेतकरी आत्माराम घोगळे यांच्या बागेत हा ससाणा जखमी अवस्थेत त्यांना दिसला असता त्यांनी सर्पमित्र श्री. गावडे यांना संपर्क करून याची माहिती दिली. यावेळी त्याला सुरक्षित ठेवण्याच्या सूचना करून ओंकार गावडे त्या ठिकाणी पोहोचत जखमी ससाण्याला प्राथमिक उपचार करून सुरक्षित ठेवले. तसेच त्यांनी नाग पकडून नाग व घार यांनाही वनविभाग चे वनरक्षक मोहन भाऊ घुटूकडे आणि शिपाई गावडे यांच्याकडे सुपूर्द केले.
ओंकार गावडे हे खाजगी हॉस्पिटलला आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून त्यांना निसर्गाबद्दल तसेच प्राण्यांबद्दल प्रेम असल्यामुळे ते सतत प्राण्यांच्या रक्षणासाठी कार्य करत असतात. आपल्या पुढील पिढीला निसर्गाचा आणि निसर्ग संपत्तीचा सहवास अनुभवता यावा तसेच निसर्ग वाचला तर मानवच वाचेल या उद्देशाने त्यांनी हे कार्य चालू ठेवले आहे. दरम्यान आपल्या परिसरात अथवा घरात साप किंवा अन्य प्राणी पक्षी आढळल्यास वनविभाग किंवा जवळच्या प्राणिमित्रास पाचारण करून निसर्ग वाचवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन ओंकार गावडे यांनी या निमित्ताने केले आहे.
( ८९९९५८६५०४ ओंकार गावडे)