कणकवली : कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या सरिता पवार याना कायद्याने वागा लोकचळवळी चा 'फातिमाबी- सावित्री' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी 11 जानेवारीला सिंधुभवन उल्हासनगर मुंबई येथे बहुमाध्यमिक लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई , मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख व मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ दीपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, कायद्याने वागा लोकचळवळी चे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उल्हासनगर महानगरपालिका माजी नगरसेविका अंजली साळवे आहेत.
यापूर्वीच्या पुरस्कार प्राप्त मानकरींची प्रतिनिधी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या अध्यक्ष वृषाली विनायक करत आहेत. कायद्याने वागा लोकचळवळी चे राज्य संघटक राकेश पद्माकर मीना यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी 3 जानेवारी रोजी या पुरस्कारांची घोषणा केली.
कायद्याने वागा लोकचळवळी च्या वतीने दरवर्षी राज्यातील निवडक व्यक्तिमत्वाना फातिमाबी-सावित्री पुरस्काराने सन्मानित केले जाते. राखायला हवी निजखूण या बहुचर्चित काव्यसंग्रहाच्या माध्यमातून कवयित्री सरिता पवार यांनी संयत विद्रोही हुंकार जागवणारे सामाजिक भान मराठी साहित्य विश्वाला दिले आहे. सरिता पवार अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमातून राष्ट्र सेवा दलाची शिबिरे आयोजित करत आहेत. संविधान मूल्ये जपणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन त्या करतात. साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत सरिता पवार यांना फातिमाबी-सावित्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास काव्यरसिक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह, एटीएम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार, कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कदंब पुरस्कार, राज्यस्तरीय सारांश पुरस्कार मिरज, राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार बुलढाणा, राज्यस्तरीय आई पुरस्कार राजापूर , अपरांत राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, कोमसाप चा नमिता किर लक्षवेधी लेखिका पुरस्कार, विनोदिनी आत्माराम फाऊंडेशन चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त असून त्यांच्या अनेक कथाना राज्य, आंतरराज्य, पुरस्कार यापूर्वी मिळाले आहेत. तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सरिता पवार यांच्यासह बोरिवली येथील नेहा जामसूतकर, लक्ष्मी यादव मुंबई , माही घाणे कल्याण, सपना राजपूत जळगाव यांनाही फातिमाबी-सावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच डॉ शामल गरुड व डॉ उषा रामवानी यांनाही कायद्याने वागा लोकचळवळी चा विशेष सन्मान पुरस्कारा ने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.