साहित्य संगीत मित्र मंडळाचे मैत्र - संगीत कला पुरस्कार जाहीर

नेत्रा पाचंगे - प्रभूदेसाई यांना मैत्र संगीत ; चित्रकार सुमन दाभोलकर यांना मैत्र कला पुरस्कार
Edited by:
Published on: December 28, 2024 13:23 PM
views 237  views

कणकवली : साहित्य संगीत मित्र मंडळ सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारे संगीत कला पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात मैत्र संगीत पुरस्कार संगीत विशारद गायिका नेत्रा पाचंगे प्रभूदेसाई (कणकवली) यांची निवड करण्यात आली आहे तर मैत्र कला पुरस्कारासाठी चित्रकार सुमन दाभोळकर (वेंगुर्ला) यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी दोन हजार, शाल आणि ग्रंथ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराने 4 जानेवारी रोजी कणकवली वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात होणाऱ्या पहिल्या साहित्य संगीत संमेलनात संमेलनाध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली. 

साहित्य संगीत कला या क्षेत्रातील गुणवंत कलावंतांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी साहित्य संगीत मित्र मंडळातर्फे यावर्षीपासून साहित्य संगीत संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी साहित्य संगीत कलाक्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देऊनही गौरविण्यात येणार आहे. यावर्षीच्या या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून मैत्री संगीत पुरस्कार विजेत्या नेत्रा पाचंगे प्रभूदेसाई या संगीत विशारद असून पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली येथे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.2007 चेन्नई आणि 2008 पंजाब  या ठिकाणी त्यांची लोकगीत या कलाप्रकारासाठी राष्ट्रीय स्तरावरती निवड झाली होती.त्या नादब्रम्ह संगीत विद्यालय कणकवली येथे संचालक म्हणून कार्यरत असून गेली 10 वर्षे नादब्रम्ह संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्या संगीताचे शिक्षण देत आहेत.

तर सुमन दाभोलकर यांनी ठाणे येथील कला महाविद्यालयातून फाईन आर्ट ह्या क्षेत्रात शिक्षण घेतले. लहानपणापासून चित्रकलेची आवड.दहावी पर्यंत वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग.त्यानंतर आवडीलाच करिअर बनवू पाहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आतापर्यंत देशांतर्गत आणि परदेशातील पंधराहून अधिक चित्र प्रदर्शनामध्ये सहभाग.चित्रकलेविषयी कार्यशाळा, सेमिनार तसेच ह्या क्षेत्राशी संबंधित विविध गोष्टींत सहभाग, टाळेबंदीच्या काळात प्रयोगशील वृत्तीमुळे निसर्गाचा एखादा भाग आपल्या कलेचाही भाग व्हावा ह्या विचाराने त्यांनी नदीत सापडलेल्या दगडांवर काम करण्यास सुरुवात केली.