देवगड : राष्ट्रीय ग्राहक दिन देवगड तहसील कार्यालय मध्ये साजरा करण्यात आला. देवगड तहसिलदार कार्यालयात पुरवठा विभागाच्यावतीने हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिनांनिमित्ताने उपस्थित ग्राहकांच्या वतीने नायब तहसिलदार सुरेंद्र कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन तहसिलदार लक्ष्मण कसेकर यांचे स्वागत केले. तहसिलदार कसेकर यांनी उपस्थित ग्राहकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तसेच पुरवठा निरिक्षक सुनिल बेबले यांनी देवगड तालुका ग्राहक मंचाचे अध्यक्ष लक्ष्मण पाताडे, मोहन पाटील, नारायण माने, व्यापारी संघटना तालुका अध्यक्ष शैलेश कदम, स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष विकास गोखले यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुशासन आठवडा अंतर्गत तहसिलदार कसेकर यांचे हस्ते डिजिटल रेशन कार्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना तहसिलदार लक्ष्मण कसेकर यांनी ग्राहकांसाठी असलेले अधिकार, हक्क याबाबतची माहिती दिली. तसेच ऑन लाईन व्यवहारात ग्राहकांची कशी फसवणूक होते आणि त्यासाठी काय करता येईल याबाबतची माहिती देऊन ग्राहकांना जागृत केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुरवठा निरिक्षक सुनिल बेबले यांनी केले.