रयत शिक्षण संस्थेच्या ८३ शाखांमधून मातोंड हायस्कूल प्रथम

Edited by: दिपेश परब
Published on: December 27, 2024 11:51 AM
views 881  views

वेंगुर्ला : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कुल मातोंड हायस्कूलने विद्यार्थी संख्येत १० टक्के वाढ करणे, एन. एन.एम.एस. मधील उल्लेखनीय यश व स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश यात मातोंड हायस्कूलने रयत शिक्षण संस्थेच्या ८३ शाखांमधून प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग सांगलीचे चेअरमन एम. बी. शेख यांच्या "वात्सल्य फाउंडेशन कोल्हापूर" या संस्थे मार्फत न्यू इंग्लिश स्कूल मातोंड हायस्कूलचा रोख रकमेची पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक संजय तुळसकर यांनी हा सन्मान स्वीकारला.

रयत शिक्षण संस्थेच्या हातकणंगले कुंबोज येथील संकुलात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक व पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू डॉ. अनिल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, संस्थेच्या कौन्सिल सदस्य सरोज एन. डी. पाटील, वात्सल्य फाउंडेशन कोल्हापूरचे अध्यक्ष एम.बी. शेख, उपाध्यक्ष डी.एम. शेख, विभागीय अधिकारी अशोक शिंदे, श्री. वाळवेकर, अँथोनी डिसोजा, श्री. शेटे उपस्थित होते. 

यावेळी शाळेने मागील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विद्यार्थी संख्येत १० टक्के वाढ केल्याबद्दल रोख १० हजार रुपये पारितोषिक आणि प्रमाणपत्र, एन.एन.एम.एस. मधील उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल रोख ५ हजार रुपये पारितोषिक आणि प्रमाणपत्र तसेच पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल रोख ५ हजार रुपये पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कुल मातोंडचे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.