साने गुरुजी कथाकथन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2024 12:42 PM
views 131  views

सावंतवाडी : खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ! अशी खऱ्या धर्माची ओढ साने गुरुजींना होती. आजच्या विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या साहित्याची माहिती व्हावी याकरिताच समर्थ सदगुरू साटम महाराज वाचन मंदिर दाणोली यांच्यावतीने साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंती चे औचित्य साधुन साने गुरुजी कथाकथनाचे अभियान राबविण्यात आले असे मत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य भरत गावडे यांनी व्यक्त केले. 

साने गुरुजी यांची १२५ जयंती साजरी करताना गेल्या सप्तहात परिसरातील प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक अशा एकूण सात शाळांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. चला समजावून घेऊया श्यामची आई, साने गुरुजींचे साहित्य, मातृ भक्त साने गुरुजी, थोर सेनानी साने गुरुजी व साने गुरुजींच्या कथांचे मंत्र आणि तंत्र या पाच विषयावर गेले सात दिवस विविध शाळांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. याला शाळांचाही प्रतिसाद उत्तम मिळाला. युनियन इंग्लिश स्कूल ,आंबोली या शाळेत ६७ विद्यार्थी व पाच शिक्षक सहभागी झाले होते. चौकुळ  इंग्लिश स्कूल चौकुळ ५८ विद्यार्थी व चार शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालय चौकुळ ३५ विद्यार्थी  व तीन शिक्षक, जि. प .शाळा भैरववाडी कारिवडे ३७ विद्यार्थी व  चार शिक्षक, जि. प .शाळा नं१  कारिवडे ३७ विद्यार्थी  व पाच  शिक्षक, जि. प. शाळा  नं  २  सावंतवाडी ७५ विद्यार्थी व पाच   शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात यूनियन इंग्लिश स्कूल आंबोली या ठिकाणी करण्यात आली होती. तर समारोप जि. प. शाळा नंबर दोन सावंतवाडी येथे करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात  साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून व खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने केली. 

यावेळी श्री. गावडे म्हणाले, साने गुरुजींच्या प्रेमाचा प्रदेश विशाल होता. अवघा भारतीय समाज कसा नांदावा याची त्यांनी सुंदर स्वप्ने रंगवले होती. तसेच उद्याचा भारत उद्याचा तरुण कसा असावा याचे सुंदर चित्र साने गुरुजींनी आपल्या साहित्यातून रेखाटले आहे. हेच साहित्य आजच्या तरुण पिढीपर्यंत जाणे महत्त्वाचे आहे. याकरिता हे अभियान राबवण्यात आले होते.गुरुजींना कथा, कादंबरी, पत्र ,कविता ,या सर्वांचाच परिचय या कार्यक्रमातून देण्यात आला आहे .सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांचे मिळालेले सहकार्य शाळा व्यवस्थापन चे अध्यक्ष यांचे सहकार्य त्यामुळे बऱ्याच शाळा पर्यंत जाता आले व साने गुरुजींचे कार्य समाजापर्यंत पोहोचावत आले.  दरम्यान, वाचनालयाच्यावतीने शाळा शाळाना श्यामची आई हे पुस्तक देण्यात येणार आहे व पुढे कथाकथनाचे कार्यक्रम केले जातील असेही त्यांनी सांगितले.