सावर्डे विद्यालयात प्लास्टिक निर्मूलन जनजागृती व्याख्यान

Edited by: मनोज पवार
Published on: December 26, 2024 12:00 PM
views 161  views

सावर्डे : प्लास्टिक हा अविघटनशील पदार्थ असल्याने त्याचे लवकर विघटन होत नाही त्यामुळे प्लास्टिकचे रिसायकलिंग करणे आवश्यक आहे. बाजारामध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केला जातो परंतु पर्यावरण संवर्धनासाठी व स्वछ मातृभूमीच्या संरक्षणासाठी विद्यार्थी या नात्याने आपण सर्वांनी स्वतःहून प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या किंवा कागदी पिशव्यांचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये लोकांना सुद्धा प्लास्टिक ऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्या वापरणे विषयी आग्रह केला पाहिजे. याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून करावी व जनजागृती करावी असे आवाहन पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी केले. 

       सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे या विद्यालयांमध्ये प्लास्टिक निर्मूलन जनजागृती निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते  उद्धव तोडकर यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकची निर्मिती कशी होते, प्लास्टिक मानवी जीवनाला कसे घातक आहे,याविषयी सविस्तर माहिती सांगितली तसेच प्लास्टिक निर्मूलनासाठी विविध उपाययोजनांविषयी माहिती सांगितली. वर्गावर्गांमध्ये साधे कागद वेगळ्या कचराकुंडी मध्ये टाकावे व प्लास्टिकचे पाऊच चॉकलेटचे कागद वेगळ्या कचराकुंडी मध्ये टाकावेत किंवा कापडी पिशवीमध्ये एकत्रित गोळा करून रिसायकलिंग साठी द्यावेत व स्वच्छ्ता शालेय जीवनापासूनच अंगिकारावी. तसेच दिनांक 29/12/2024 रोजी चिपळूण येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. धावू प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी हे ब्रीद घेऊन मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत या विद्यालयातील अनेक विद्यार्थी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत त्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

या स्पर्धेला संपूर्ण राज्यभरातून खेळाडू उपस्थित राहणार आहेत आणि या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्तीचा जर संदेश दिला तो संपूर्ण राज्यभर पोहोचेल आणि राज्य प्लास्टिक मुक्त होण्यास मदत होईल. प्रमुख वक्ते उद्धव तोडकर यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य  राजेंद्र वारे यांनी कागदी बुके देऊन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शितोळे  यांनी केले.