
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने 'महात्मा गांधीची स्वच्छता अभियानांतर्गत गांधी तीर्थ जळगाव यांच्या प्रेरणेने शाळेचा परिसर व सावर्डे परिसरात स्वच्छता अभियानाचे वेळोवेळी आयोजन करून समाजामध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन स्वच्छते विषयी जाणीव जागृती निर्माण करण्याचे काम विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पार पाडत आहे.
स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठाचे धडे प्रत्यक्ष सहभागातून विद्यार्थ्यांना प्राप्त होतात. या अभियानामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व उस्फूर्तपणे सावर्डे सहाण, मशीद व हायवेच्या परिसरातील संपूर्ण भाग स्वच्छ करून ओला व सुका कचरा वेगळा करून सेंद्रिय खत निर्मितीसाठी त्याचा उपयोग केला.
सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सावर्डे परिसरातील नागरिक पालक यांचेकडून कौतुक होत आहे त्याच बरोबर विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे या उपक्रमात सहभाग नोंदविल्या बद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक श्री. उध्दव तोडकर यांनी विद्यार्थ्यांची अभिनंदन केले आहे.