सावर्डे : संत गाडगेबाबा महाराष्ट्राचे चालते विद्यापीठ होते. ते सांगायचे देव दगडात नाही, देव माणसात आहे. माणसांची सेवा हाच खरा परमार्थ आहे. अस्पृश्यता पाळू नका, गरिबांना मदत करा, रुग्णांना औषध-उपचार द्या. तहानलेल्याना पाणी द्या, भुकेलेल्या अन्न द्या, गरिबांना शिक्षण द्या, निराश्रितांना आश्रय द्या, बेरोजगारांना रोजगार द्या, मुक्या प्राण्यांना अभय द्या, असे त्यांचे साधे सोपे तत्त्वज्ञान होते. त्यांना लाखो लोकांनी कोट्यावधी रुपये दिले, परंतु तो पैसा त्यांनी स्वतःच्या किंवा मुलांच्या नावावर कधी केला नाही, तर लोककल्याणासाठी त्यातील पै ना पै वापरला.गाडगेबाबा स्वच्छ हाताचे, स्वच्छ मनाचे महापुरुष होते. त्यांना कोणी पाचीपक्वानाचे जेवण दिले तर ते गरिबांना द्यायचे व गरीबाची चटणी भाकरी आनंदाने खायचे. असा हे महायोगी आधुनिक भारताचे वैभवशाली आणि अभिमानास्पद संत आहेत असे प्रतिपादन उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. समीक्षा बागवे व अविनाश पोतदार यांनी भित्तीपत्रकाद्वारे त्यांचे कार्य सचित्रपणे विद्यार्थ्यांच्या समोर उभे केले. भीतीपत्रकाचे उद्घाटन विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. देव माणूस अथवा संत माणूस म्हणून जगण्यापेक्षा माणसातच देव शोधून मानवाची सेवा करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारलेले होते व ते आयुष्यभर जपले होते त्यांची ही शिकवण सर्वांनी अंगीकारली पाहिजे व विद्यार्थ्यांनी स्वच्छता पाळून त्याचे महत्त्व कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे असे सुरेंद्र अवघडे व जयंत काकडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.