
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान १,२ व ३ मध्ये कोकण विभागात सातत्याने प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त केलेले आहे. त्या अनुषंगाने नगरपरिषदेने माझी वसुधरा अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम यांची माहिती जाणून घेण्यासाठी विभागीय तांत्रिक तज्ञ मंदार पाटील, प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग यांच्याकडून प्रत्यक्ष भेट दिली. नगरपरिषदेने माझी वसुंधरा अंतर्गत केलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांच्यासमवेत नगरपरिषदेने राबविलेल्या विविध उपक्रमाची पाहणी करून कौतुक केले.
सावंतवाडी नगरपरिषदेचे माझी वसुंधरा अंतर्गत असलेले काम हे राज्यस्तरावर मानांकन प्राप्त करण्याजोगे आहे. सावंतवाडी नगरपरिषदेस राज्यस्तरावर उच्चस्तर क्रमांक प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांच्यामार्फत देण्यात आल्या. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दिशादर्शक फलक बनविणे, ज्येष्ठ नागरिकांना माझी वसुंधरा अभियानाची माहिती देणे, शहरामध्ये बांबू व शेवगा लागवड करणे, सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे,शहरातील पेट्रोल पंप व्यावसायिक यांना चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे, शहरात होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माझी वसुंधरा अभियानाची प्रचार प्रसिद्धी करणे व हरित शपथ घेणे, शहरकरिता अभियानाअंतर्गत CSR फंड उपलब्ध करून घेणे अशा विविध मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. विभागीय तंत्रज्ञ यांच्या नप्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सावंतवाडी नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान व NULM अंतर्गत शहरातील सर्व महिला बचत गटांना माझी वसुंधरा अभियानाची माहिती दिली व हरित शपथ देण्यात आली. तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत व स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अभियान, कुशाय इनोवेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्यविषयक व वसुंधरेच्या कार्यशाळेचे आयोजन नगरपरिषदेच्या काझी शहाबुद्दिन हॉल येथे करण्यात आले होते. आपल्या शहराची स्वच्छता करण्यासोबत आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, PPE किट या वापर तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणातील संरक्षण करण्यासाठी भूमी, वायु, जल, अग्नि व आकाश या पाच पंचतत्वांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख धनंजय देसाई, स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, दीपक म्हापसेकर उद्द्यान पर्यवेक्षक गजानन परब आदी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये सुमारे ८० स्वच्छता मित्रांनी सहभाग घेतला होता. यावेळी माझी वसुंधरा ५.० अंतर्गत हरिथ शपथ नगरपरिषदेमार्फत घेण्यात आली. कुशाग्र इनोवेशन फाउंडेशनच्या ललित पेडणेकर यांच्या मार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यामध्ये स्वच्छतेविषयक व माझी वसुधरा विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सफाई कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या सफाई कर्मचारी यांना बक्षीस देऊन व पर्यावरण दूत प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.