
चिपळूण : शहरातील जिवन विकास सेवा संघ, ओतारी आई चॅरिटेबल फाउंडेशन, आणि कार्तिकी हेल्थ केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत चिकित्सा व प्राथमिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. 13 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जिवन विकास सेवा संघाच्या सभागृहात या शिबिराला सुरुवात झाली.
खेड येथील योगिता डेंटल कॉलेजच्या सहकार्याने आयोजित या शिबिरास चिपळूणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी दातांची काळजी, दातातील कीड, रूट कॅनॉल उपचार, हिरड्यांचे आजार, दातदुखी यासंबंधी मार्गदर्शन केले. अनेक रुग्णांचे तपासणीसह उपचार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, डॉक्टर्स, आणि डेंटल कॉलेजचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अशा लोकहितकारी उपक्रमांची व्याप्ती ग्रामीण भागांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट मांडण्यात आले.
जिवन विकास सेवा संघाच्या संस्थापिका अध्यक्षा संगीता ओतारी, पदाधिकारी धनंजय काळे, शर्मिला धुरी, अश्विनी तांबे, प्रशांत परब, तसेच कार्तिकी हेल्थ केअर ट्रस्टचे उपअध्यक्ष राजन सकटे, सचिन धाडवे, यशवंत धाडवे, महादेव येसाणे, आणि बंधू दळी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. डेंटल कॉलेजच्या तज्ञ टीमचे ओम गंगावणे, अश्विनी घुले, मुक्ताई मुंडे, अलीशा कामेरकर, रुपाली मदणे, आणि साक्षी पाडगीलवार यांनी रुग्णांची तपासणी व उपचार केले.हा उपक्रम भविष्यातही विविध ठिकाणी राबवून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.