५२ व्या कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: December 12, 2024 18:30 PM
views 513  views

 कुडाळ  :  विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असतो तो सादर करण्यासाठी त्यांना व्यासपीठाची गरज असते. म्हणून अशा पद्धतीने शासनाकडून  विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थी फार चौकस असतात शालेय दशेत त्यांना अनेक प्रश्न पडत असतात अशावेळी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल तर ते पालक व शिक्षकांनी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यास ते विद्यार्थी निश्चितच यशस्वी होऊ शकतात. आज बाल वैज्ञानिकानी मांडलेल्या विज्ञान प्रतिकृती तालुकास्तरापर्यंतच मर्यादित न राहता, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरापर्यंत  जाऊन आपला विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत पोहोचावा अशी माझी इच्छा आहे. श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूरने अत्यंत चांगल्या पद्धतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक पालक यांचे आभार व्यक्त करतो." असे प्रतिपादन कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक यांनी श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. 

शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग  व पंचायत समिती कुडाळ संचलित आणि श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर आयोजित शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयावर आधारित  ५२ वे कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज गुरुवार दिनांक १२ डिसेंबर आणि शुक्रवार १३ डिसेंबर या कालावधीत श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरुर येथे संपन्न होत आहे. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज कुडाळ गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष कमलाकर नाईक, उपाध्यक्ष प्रदीप नाईक, नेरुर सरपंच भक्ती घाडी, रचना नेरूरकर,  मुख्याध्यापिका सुनीती नाईक,  गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, यांच्यासह सर्व  शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व शिक्षक ( उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक ) शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते. 

यानंतर बोलताना संस्था अध्यक्ष कमलाकर नाईक यांनी असे प्रतिपादन केले की, प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान हे असल्याच पाहिजे विज्ञान हे तुमच्यासाठी संशोधन असतं, कसोटी असते. विश्वास असल्याशिवाय आणि आत्मविश्वास वाढल्याशिवाय वैज्ञानिक घडत नसतो. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न शिक्षक करत असतात. आणि त्यातूनच भविष्यात वैज्ञानिक निर्माण होत असतो. असे सांगून कमलाकर नाईक यांनी प्रशासनाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूरची निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. 

यानंतर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, संस्था अध्यक्ष कमलाकर नाईक आणि सरपंच भक्ती घाडी, गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर यांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रतिकृतींच्या दालनांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  विशेष दालनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या प्रदर्शनामध्ये ७८ प्रतिकृतीं स्पर्धेसाठी मांडण्यात आल्या होत्या.