
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे भुलतज्ञ एकच असुन दोन भुलतज्ञ दिल्यास सावंतवाडीमधील आरोग्य विभागाचे उत्तम कार्य, याहून अधिक चांगले होऊ शकते. त्यामुळे येथे अजून एक भुलतज्ञ द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी केली असून कोल्हापूर आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. दिलीप माने यांचं लक्ष वेधलं आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे भुलतज्ञ डॉक्टर क्षमा देशपांडे यांनी बरेच वर्षे भुलतज्ञ म्हणून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात चांगली सेवा दिलेली आहे. एकच भूलतज्ञ असल्याने व रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने कामाचा ताण वाढत आहे. यासाठी दोन भूलतज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. यामुळे गरोदर स्त्रीयांची प्रसूती, जनरल सर्जनची शस्त्रक्रिया, अपेन्डिस, हर्निया अशा रुग्णांची शस्त्रक्रिया भूलतज्ञ नसल्याने थांबणार आहे. गोरगरीब रुग्णांना अन्यत्र खाजगी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जावे लागणार आहे. गोरगरीब रुग्णांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारे असून कामाचा ताण पाहता यासाठी कमीत कमी दोन भूलतज्ञ डॉक्टर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये मिळावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी केली आहे.