
सावंतवाडी : दाणोली येथील साटम महाराज वाचन मंदिर आणि कोलगाव निरामय विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत पूर्व प्रजलित सावंत याने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत सानवी नितीन धुरी व रमाकांत गुरुनाथ ढवळे यांनी द्वितीय क्रमांक तर रेखा रमाकांत सावंत आणि तनय विकास परब यानी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी रविराज धुरी, सारिका संजय नाईक, अपूर्वा अनंत सावंत, मंजिरी रामकृष्ण देऊस्कर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेचे दाणोली परिसरातील दहा शाळा सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी संस्कार कथा, नीतिकथा साने गुरुजींच्या कथा सांगितल्या होत्या. या स्पर्धेला परीक्षक म्हणून श्रीमती वंदना करंबेळकर, कुमारी निकिता टिपणीस यांनी काम पाहिले.या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकासह उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, भेटवस्तू व ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षकांचाही गुणगौरव करण्यात करण्यात आला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी निरामय विकास केंद्राच्या संचालिका श्रीमती वंदना करंबेळकर, माडखोल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक चिंतामणी मुंडले, वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे, संचालक कृष्णाजी परब, गिरीधर चव्हाण, सुरेश आडेलकर, माधुरी चव्हाण, ग्रंथपाल सौ. दिपा सुकी, पवन केसरकर, प्रसाद बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भरत गावडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे मुलांनी आता अधिकाधिक चांगले बोलले पाहिजे. चांगले लिहिले पाहिजे. चांगले ऐकले पाहिजे. तसेच संवाद कौशल्य वाढविले पाहिजे असे आवाहन करीत यासाठीच या स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले. यावेळी निरामय विकास केंद्राच्या संचालिका श्रीमती वंदना करंबेळकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेसाठी ग्रंथपाल सौ. दिपा सुकी आणि पवन केसरकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत गावडे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रसाद बांदेकर यांनी मानले.