
देवगड : देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव- राकसघाटी येथे देवगडवरुन नांदगावकडे जाणा-या कारला गवारेड्याची जोरदार धडक बसल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. हिघटना शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. देवगड तालुक्यातील इळये येथील अभिषेक मिराशी हे कारने इळये येथून नांदगावकडे जात असताना शिरगाव राकसघाटी ( कापीचा चाळा) येथे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या गवारेड्याने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने गाडीमधील कोणासही दुखापत झाली नाही.
या घटने बाबतआज सकाळी वनविभागाचे देवगडचे वनपाल श्री कृष्ण परीट व ठाकूरवाडी वनरक्षक रामदास घुगे हे आज परत घटनास्थळी आल्यावर त्यांच्या सोबत उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, अमित साळगावकर, रवींद्र जोगल, यांनी या घटनास्थळी त्यांच्या सोबत या घटने बाबत चर्चा केली. शिरगाव परिसरातील गवारेड्याच्या हल्ल्यातील ९ महिन्यातील ही पाचवी घटना आहे. फेब्रुवारी महिन्यात राकसघाटी येथे चारचाकी गाडीवर गवारेड्याने हल्ला केल्याने अपघात झाला होता. मार्च महिन्यात शिरगांव कुवळे मार्गावर चौकेवाडी फाट्यानजीक बाबल्या पवार यांच्या दुचाकीवर गवारेड्याने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले होते.
तसेच एप्रिल महिन्यात गवारेड्याच्या हल्ल्यात प्रकाश गोगटे यांच्या चारचाकीचे मोठे नुकसान झाले होते.तसेच गेल्या महिन्यात शिरगांव- राकसघाटी येथे गव्यारेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. शिरगाव-राकसघाटी येथे गवारेड्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे ग्रामस्थां मद्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याची वेळीच दखल घ्यावी यासाठी आज घटना स्थळी उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, अमित साळगावकर, रवींद्र जोगल यांनी या घटनास्थळी वनपाल यांच्या सोबत या घटने बाबत चर्चा करून योग्य ती दखल घ्यावी व परत अश्या घटना घडू नये अशी मागणी केली आहे.