टेम्पोची ठोकर, 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

स्थानिकांनी चालकाला चोपलं, पोलिसांना धरलं धारेवर
Edited by: लवू परब
Published on: December 06, 2024 16:07 PM
views 1540  views

दोडामार्ग : दोडामार्ग वीजघर मार्गावर झरेबांबर येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात ७ वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रिया संदीप गवस ( वय - 7) रा. मांगेली असं या दुर्दैवी बालिकेच नाव आहे. भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने ठोकर दिल्याने हा अपघात घडला. अपघातात सुरुवातीला धडक बसून जमिनीवर कोसळलेल्या श्रियाच्या डोकं व मानेवरून टेम्पोचं चाक गेल्याने  तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिकांनी या अपघातानंतर श्रिया ला वाचवण्यासाठी धावपळ केली. मात्र दोडामार्ग रुग्णालयात  तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

झरेबांबर सरगवे पुनर्वसन तिठा येथे हा दुपारी १२ च्या सुमारास दुर्दैवी अपघात झाला. अपघाताची बातमी समजताच तालुकाभरातून एकच गर्दी केली. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालक टेम्पो चालक सुरेश पुंडलिक पवार (20 ) याला नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिला. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांनाही चांगलेच फैलावर घेतले. राजन म्हापसेकर व पोलिसांत यावेळी शब्दिक बाचबाचीही झाली. तिलारी घाट रस्ता अवजड वाहतूकीसाठी बंद असताना यां गाड्या येतात कशा ? हप्ते बाजी घेऊन पोलीस या गाड्या सोडतात. असा थेट आरोप यावेळी उपस्थित जमावाने केला. तर अपघात करून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकावर 302 कलम लावून कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी बराच वेळ अपघात स्थळी तणावपूर्ण वातावरण होते.
 मृत मुलगी तिच्या आईसह गुरुवारी झरेबांबर गावच्या जात्रोत्सवास आली होती. ती शुक्रवारी पुन्हा मांगेली येथे आपल्या घरी परतत असताना हा अत्यंत दुःखद घटनेला त्यांना सामोरे जावे लागले. मृत मुलीच्या पश्चात आई - वडील, एक बहीण, भाऊ, आजी आजोबा असा परिवार आहे. घरची परिस्तिथी गरिबीची आहे. आई वडील शेती करतात.

यावेळी अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता बांधकाम विभागाने या ठिकाणी तात्काळ गतिरोधक घालावेत, अशी मागणी उपस्थितांनी केली. त्याला उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या ठिकाणी तातडीने गतिरोधक न घातल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.