सावंतवाडी : 1 डिसेंबर 2024 ते दिनांक 15 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येत असून सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक पुणे यांचे 20 जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.
सदर पथकामार्फत आज दिनांक 03 डिसेंबर 2024 रोजी सावंतवाडी तालुक्यातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल अॅण्ड ज्यू. कॉलेज सावंतवाडी येथे शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचा 240 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विषयक विविध प्रात्यक्षिके NDRF पथकामार्फत दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सदर प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभाग दर्शविला.
कार्यक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, नायब तहसीलदार श्रीमती तारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.धोंड,उप मुख्याध्यापिका श्रीमती कशाळीकर व प्रशालेतील शिक्षक उपस्थित होते.