दोडामार्ग : दोडामार्ग ते विजघर या राज्यमार्गावरुन प्रवास करणे अधिक सुखकर होणार आहे. कारण या मार्गाची रुंदी वाढवण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी राज्य शासनाने १३० कोटी रुपये निधी दिल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुतोवाच केले होते. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याला दुजोरा देत निविदा प्रक्रिया राबविली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सद्यस्थितीत ५.५० मीटर रुंद असलेला हा राज्यमार्ग ७ मीटर इतका रुंद होणार आहे.
दोडामार्ग ते विजघर राज्यमार्गावरून अलीकडे वाहनांची वर्दळ वाढली आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, तेलंगाना, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक यांसह महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील पर्यटक गोव्याला याच मार्गाने जातात. कारण गुगल मॅपद्वारे हा मार्ग जवळचा दाखविला जातो. वर्दळ वाढल्याने हा मार्ग रुंद होण्याची शक्यता निरृमाण झाली व तशी मागणी होऊ लागली.
अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी तर्फे कर्नाटक मधील बंगळुरू येथील एका खाजगी कंपनीला या राज्यमार्गाचे सर्वेक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार या राज्यमार्गावरून दिवसाला किती वाहने धावतात? व अद्ययावत राज्यमार्ग करण्यासाठी या वाहनांचा भारमान किती आहे? याचे सर्वेक्षण या खाजगी कंपनीने नोव्हेंबर महिन्यात केले होते. या मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या दुचाकी व्यतिरीक्त सर्वच वाहनांची एका यंत्रावर तपासणी केली होती. या खाजगी कंपनीने हा सर्व डाटा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचे अंदाजपत्रक तयार करून ते मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविले होते.
ना. केसरकर यांनी केले होते सुतोवाच
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एका पत्रकार परिषदेत सुतोवाच केले होते की लवकरच दोडामार्ग - विजघर राज्यमार्गाचे रुंदीकरण होणार आहे. यासाठी राज्य शासनाने तब्बल १३० कोटी रुपये निधी दिल्याचे त्यांनी सांगितले होते. या मार्गाच्या रुंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनीही याला दुजोरा दिला. शिवाय याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कार्यारंभ आदेश निघणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच या मार्गावरून प्रवास करणे अधिक सुखकर होणार आहे.
फोटो
याच आहे.