
सावंतवाडी : आदर्श उपक्रमशील प्राथमिक शिक्षक दत्ताराम सावंत नेहमीच विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी झटत असतात. यामुळे त्यांना जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचा उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. सातत्याने नवीन काहीतरी करण्याची जिद्द आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ते झटत असतात. सध्या 'आनंददायी कृतीयुक्त विज्ञान अध्यापन' हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरमळे शितप येथे राबविला जात आहे. शाळेतील विज्ञान प्रेमी प्राथमिक शिक्षक दत्ताराम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी 'आनंददायी कृतीयुक्त विज्ञान' शिकत आहेत.
नाविन्यपूर्ण अध्यापन आणि विविध प्रयोगातून मुलांमध्ये विज्ञानाची अभिरुची वाढत आहे. विद्यार्थी स्वतः आत्मविश्वासाने बोलत आहेत. ही शाळा दुर्गम भागातील शाळा असून सुद्धा मुलांची गुणवत्ता मात्र वाखणण्यासारखी आहे. विद्यार्थी आत्मविश्वासाने स्वतः प्रयोग करत आहेत. प्रयोगाची माहिती स्वतः सादर करीत आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य होत आहे. शिक्षक दत्ताराम सावंत यांचे सर्व शिक्षक, पालक यांच्याकडून या उपक्रमाबद्दल कौतुक होत असून शाळेतील सहाय्यक शिक्षक सुदाम वाघेरा तसेच केंद्रप्रमुख प्रमोद पावसकर यांचे या उपक्रमाला विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
दरम्यान, कृतीयुक्त विज्ञान अध्ययन - अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या मनातील विज्ञानाबद्दल अभिरुची आपोआप वाढते आणि ते स्वतः प्रयोग करू लागतात. यामुळे भविष्यात विद्यार्थी विज्ञानात भरारी घेणार असून शास्त्रज्ञ घडण्यासाठी हा उपक्रम अतिशय फलदायी आहे, असे मत विज्ञानप्रेमी शिक्षक दत्ताराम सावंत यांनी व्यक्त केले.