ज्येष्ठ भजनी बुवा विजय गुरव यांचे निधन

Edited by: दीपेश परब
Published on: October 14, 2024 04:39 AM
views 312  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला-रामेश्वर मंदिर नजिकचे रहिवासी, रामेश्वर भजन मंडळाचे ज्येष्ठ बुवा, पूर्वीच्या "रामेश्वर कृपा' ऑटोरिक्षेचे मालक विजय गणेश गुरव (७२) यांचे १२ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निवासस्थानी निधन झाले.

आपले वडील कै.काका गुरव यांच्यासोबत रामेश्वर देवस्थान जिर्णोद्धारासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. शैव गुरव समाजोत्कर्षक मंडळ सिंधुदुर्ग-गोवा या मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. रामेश्वर बाल दशावतार नाट्य मंडळ सुरू करण्यामागे त्यांचे प्रोत्साहन होते. जलस्वराज्य अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निशाण तलाव येथे स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक म्हणून १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रथम झेंडावंदन करण्याचा मान विजय गुरव यांना मिळाला होता. ब-याच युवा पिढीला वारकरी भजनाची गोडी लाऊन त्यांना भजन क्षेत्रात मार्गदर्शन केले होते. रामेश्वर मंदिर, भुजनाकवाडी विठ्ठल मंदिर, कुबलवाडा एकमुखी दत्तमंदिर आणि उत्सवावेळी वेंगुर्ला बसस्थानक साई मंदिर येथे नेहमी त्यांची भजन सेवा सुरु असायची.  

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, जावई, नात असा परिवार आहे. वेंगुर्ला येथील पत्रकार तथा रामेश्वर दशावतार मंडळाचे मालक प्रथमेश उर्फ भैय्या गुरव यांचे ते वडील होत.