आचारसंहितेनंतर आंदोलन छेडण्याचा इशारा

Edited by: विनायक गांवस
Published on: October 09, 2024 14:51 PM
views 115  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रशासन व सरकारकडून सावंतवाडीकरांना पान पुसण्याच काम केलं जातं आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि गाड्यांना थांबा मिळावा यासाठी रेलरोको सारखे आंदोलन छेडण्यासाठी प्रशासन आम्हाला भाग पाडत आहे. त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास आचारसंहितेनंतर आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी दिला.

मिहीर मठकर म्हणाले, सावंतवाडी टर्मिनस आणि गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आंदोलन, साकारत्मक पाठपुरावा सुरू आहे. मात्र, मंगलोर गाडी थांबली नाही. गरिबरथ व राजधानी थांबेल अशी अपेक्षा आहे. कोकण रेल्वे प्रशासन व सरकारकडून सावंतवाडीकरांना पान पुसण्याच काम होत आहे. त्यामुळे आचारसंहितेंनतर जनआंदोलन उभे करावे लागेल अथवा रेलरोको आंदोलन छेडण्याचा विचार करावा लागेल असा इशारा दिला. तसेच सावंतवाडी टर्मिनस व जादाच्या गाड्या थांबल्या पाहिजेत. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली तेव्हा वंदेभारत मागणी केली. मात्र, यश मिळाले नाही. मंत्री केसरकर यांना गांभीर्यान घेतल नाही. कोकण रेल्वे आणि शिक्षणमंत्री यांना गांभिर्य नसल्याने पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही देत आहोत. तसेच स्थानकाला सुशोभीकरण करत लोकार्पण केले. मात्र, विद्युत रोषणाई रात्री गायब होते. स्थानक अंधारात असते. मग, कोट्यवधी रूपये खर्च करून सुशोभिकरण केलं कशासाठी ? याठिकाणी यापूर्वी अतिप्रसंगासारखा प्रकार घडला,  अपघात घडला. त्यामुळे वीज कायमस्वरूपी सुरू राहीली पाहिजे अशी मागणी मिहीर मठकर यांनी केली.

तर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, स्वर्गीय जयानंद मठकर यांनी सावंतवाडी टर्मिनसबाबतीत आंदोलन छेडले होते. आता रेल्वे प्रवासी संघटनेने आंदोलन केले आहे. सतत पाठपुरावा सुरू आहे. इथल्या नेत्यांमध्ये धमक नाही त्यामुळे गाड्यांना थांबा आणि टर्मिनस काम झाले नाही. सावंतवाडी शहर आणि परिसरात रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला तर फायदा होणार आहे. त्यामुळे जनआंदोलन छेडले जाईल असं मत श्री. साळगावकर यांनी व्यक्त केले. यावेळी सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नंदू तारी, सागर नाणोसकर, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर आदी उपस्थित होते.