
नवरात्र म्हटलं की सगळीकडे दिसतो तो स्त्री शक्तीचा जागर. याच धर्तीवर चिपळूण मधील चार दुर्गानी *पुणे ते अयोध्या* ही सायकल सफर करून एक आगळा वेगळा उपक्रम केला आहे.
चिपळूण मधील सौ धनश्री गोखले, डॉ सौ अश्विनी गणपत्ये, सौ रमा करमरकर आणि सौ ज्योती परांजपे या सायकल स्वार महिलांनी 21 सप्टेंबर रोजी पुण्याहून आपल्या सायकल यात्रेस प्रारंभ केला. रोज साधारण 125-150 किमी अंतर पार करत, महाराष्ट्रातील संगमनेर, मालेगाव, शिरपूर या शहरांना भेट देत त्यांनी मध्य प्रदेश येथील पुण्यशलोक अहील्याबाई होळकर यांच्या महेश्वर नगरीस भेट दिली तिथे त्यांचा राजवाडा, महेश्र्वराचे देऊळ आणि नर्मदा घाट या स्थानांना भेट देऊन पुढे श्री ओंकारेश्वराच्या दर्शनाला रवाना झाल्या. तिथे श्री ओंकारेश्वर तसेच अमलेश्वराचा आशीर्वाद घेऊन, पहिले बाजीराव पेशवे यांच्या समाधीस भेट देऊन त्यांनी इंदोर गाठले. इंदोर मध्ये त्यांनी चिपळूणच्या माहेरवाशीण तसेच माजी लोकसभा अध्यक्षा आणि आपल्या लाडक्या श्रीमती सुमित्राताई महाजन यांची भेट घेतली. त्यानंतर उज्जैन मध्ये श्री महाकालाचे दर्शन घेऊन उत्तर प्रदेश मधील झांसी येथील राणी लक्षीबाई समोर नतमस्तक होत, लखनौ शहराला भेट देऊन दिनांक 4 ऑक्टोबर, 2024 रोजी अयोध्या येथे सुखरूप पोहोचल्या.
या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्यासोबत असलेल्या श्री जयंत केळकर आणि श्री वसंत जोशी यांची साथ लाभली. तसेच सर्व प्रवासात त्यांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले. या सायकल यात्रेचा उद्देश रामलल्लाचे दर्शन होतेच पण नवरात्रीचे औचित्य साधून "स्वतःला कमी ना लेखता, तंदुरुस्त राहून, नोकरी - व्यवसाय, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना सांभाळून स्वतःसाठी सुध्धा वेळ काढणं गरजेचं आहे!" हा नारी - मातृ शक्तीचा संदेश त्यांनी दिला. या चौघींच्या कामगिरीचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.