कोणत्याही परिस्थितीत ताज प्रकल्पाचे भूमिपूजन होऊ देणार नाही

वेळागरवासीयांचा एल्गार
Edited by: दिपेश परब
Published on: October 02, 2024 14:57 PM
views 225  views

वेंगुर्ले : शिरोडा येथील ताज प्रकल्पासाठी गेलेल्या वेळागरवाडी येथील ९ हेक्टर गावठाण क्षेत्र वगळल्याशिवाय येथे पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन  कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय खाडीपात्रातून बाहेर येणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन भूमिपुत्रांनी आज येथील खाडीपत्रात उतरून आंदोलन छेडले. सायंकाळी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर भूमीपुत्रांनी तात्पुर्ते हे आंदोलन स्थगित केले आहे.

     वेळागर येथील ताजच्या पर्यटन प्रकल्पाला आम्ही विरोध करत नाही, पण आमच्या वहिवाटीतील ९ हेक्टर क्षेत्र वगळण्यात यावे, या मागणीला वारंवार वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले जात आहे. प्रशासनाकडून खोटी आश्वासने देऊन आमच्या आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. आमच्या मागणीला बगल देऊन वेळागरमध्ये पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन होत असेल तर त्याला आमचा प्राणपणाने विरोध आहे. आमची मागणी मान्य व्हावी यासाठी गांधी जयंतीदिनी आम्ही वेळागरमधील सर्व अबालवृद्ध वेळागर खाडीतील पाण्यात उतरून जलआंदोलन करत आहोत, अशी भूमिका घेऊन वेळागरवासीयांनी आपल्या एकजुटीचे प्रदर्शन घडविले. 

    यावेळी बोलताना माजी सभापती जयप्रकाश चमणकर म्हणाले, १९९५ पासून आम्ही सरकारविरोधात लढा देत आहोत. मुळातच येथील कोणाही भूमिपुत्राची मान्यता न घेता येथील सुमारे १४२ हेक्टर क्षेत्र एमटीडीसीने आरक्षित केले आहे. त्यामुळे पर्यटनातून विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, भूमिपुत्रांना विश्वासात न घेता त्यांना विस्तापित करून विकास करत असाल तर आम्हाला तुमचा पर्यटन विकास नको. आम्हाला सरकारने अनुदान द्यावे, आम्ही तंबू निवास, 'अतिथी देवो भव'च्या माध्यमातून छोटेमोठे पर्यटन प्रकल्प सुरू करू ग्रामस्थ मागणी करत असलेले ९ हेक्टर क्षेत्र हे येथील गावठाण क्षेत्र आहे. यात त्यांची पिढीजात घरे आहेत, शेतमांगर आहेत, आणि रोजीरोटी मिळविण्यासाठी शेतशिवारही आहे. येथील रहिवासी समुद्र जवळ असल्याने मासेमारीचा व्यवसाय करतो. त्यांना विस्तापित केल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. भूमीपुत्र मागणी करत असलेले ९ हेक्टर क्षेत्र वगळूनही शासनाकडे ३२.६३ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहते. एवढे क्षेत्र पंचतारांकित हॉटेलसारख्या प्रकल्पाला पुरून उरणारे आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ आमच्या वहिवाटीतील क्षेत्र वगळावे, अशी मागणीही चमणकर यांनी केली.

     दरम्यान, सायंकाळी ४.३० वाजता सावंतवाडी उपविभागाचे प्रमुख हेमंत निकम यांनी उभादांडा गावचे सरपंच नीलेश चमणकर यांच्या सोबतीने आंदोलनस्थळी भेट देऊन भूमीपुत्रांची बाजू ऐकून घेतली. यावेळी ते म्हणाले, आपण याबाबतच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला असून भूमीपुत्रांची बाजू नैतिकदृष्ट्या योग्यच आहे मात्र, काही भूमीपुत्रांनी जमिनीचा मोबादला घेतला असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. येथे पर्यटन प्रकल्पाला पुरेशी जागा असल्याने गावठाण क्षेत्र वगळण्याबाबत आपण स्वतः शासनाकडे शिफारस प्रस्ताव पाठवत आहे. - याबाबतच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता तात्काळ करून गुरुवार ३ रोजी हा प्रस्ताव भूमीपुत्रांच्या शिष्टमंडळासमक्षच शासनाला पाठविणार आहे, त्यामुळे हे आंदोलन स्थगित करा, असे ते म्हणाले. प्रांताधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत भूमीपुत्रांनी हे आंदोलन तात्पुर्ते स्थगित केले आहे. आंदोलनादरम्यान ठाकरे शिवसेनेचे विधानसभा - मतदारसंघप्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ आदींनी भेट दिली.