
देवगड : देवगड तालुक्यात कलाकारांच्या हितासाठी व शासकीय योजना कलाकारांपर्यंतपोहोचविण्यासाठी विभागवार कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शन नाट्य व सिने कलादिग्दर्शक डाॅ.भाई बांदकर यांनी केले.ते म्हणाले की 64 कलाक्षेत्रातील कलाकार बहुसंख्येने कोकणातच आहेत. त्या व्यतिरिक्त रांगोळी, फुगडी, घुमटवादक, शिमगोत्सवातील सोंगें इत्यादी कलाकार अनभिज्ञच आहेत. फक्त देवगडमध्ये सर्व कलाक्षेत्रातील अंदाजे साडेतीन हजारच्यावर कलाकार आहेत.त्यांनाच संघटित करण्याकरीता कलाकार महासंघाची स्थापना करण्यात येणार आहे.त्याकरीता या व अशा कलाकार मेळाव्यातून कलाकार नोंदणी केली जात आहे. कोकणातील कलाकारांना शासनाच्या योजना समजाव्यात तसेच त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी सहकार्य करणे याबरोबरच प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी कलाकार महासंघ कार्य करील.
पुढे ते म्हणाले की लवकरच नाट्य परिषद देवगड शाखेची स्थापना करण्यात येणार आहे. त्याकरीताही महासंघ कार्यरत राहील,असे कलाकार मेळावे सिंधुदुर्गात ठिकठिकाणी घेतले जाणार आहेत.या कलाकार मेळाव्याचे आयोजन तळवडे सरपंच गोपाळ रुमडे व माजी सरपंच पंकज दुखंडे यांच्या संयोजनातून व्हिक्टोरियस इंग्लिश मेडीयम स्कूल, तळेबाजार, येथे करण्यात आले होते.तसेच वाडा येथे हर्षद जोशी गायीका प्रियांका वेलणकर व किसान मोर्चा-भाजपाचे पडेल मंडल सरचिटणीस सतिश जाधव यांच्या संयोजनातून वाडा हायस्कूल हाॅल, वाडा, येथे आयोजित करण्यात आले होते.
या दोन्ही कार्यक्रमात डाॅ.गुरुदेव परुळेकर यांनी कलाकारांसाठी शासकीय योजना सविस्तर सांगितल्या तसेच कलाकार महासंघ कसा कार्यरत राहील त्यावर भाष्य केले.सिंधु ग्राम विकास फाऊंडेशन (रजि.) चे उपाध्यक्ष डाॅ.कृष्णा बांदकर यांनी या एनजीओचे सहकार्य कसे कलाकार महासंघाला होईल याविषयी सविस्तर माहिती दिली. व त्यांनी या कलाकार महासंघात व अ.भा.म.नाट्य परिषदेसाठी जास्तीत जास्त कलाकारांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले.
वाडा येथील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिने क्षेत्रातील जाणकार व अभिनेते प्रकाश गोगटे यांनी कलाकार महासंघाचे महत्त्व पटवून दिले.व महासंघाच्या प्रत्येक कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास किसान मोर्चा-भाजपाचे देवगड मंडल उपाध्यक्ष जितेंद्र उपरकर, सरपंच, जेष्ठ कलाकार विद्याधर कार्लेकर, राऊतसर, विविध गावातील भजनीबुवा, फुगडी मंडळे, तळवडे गावातील तमाशाचे कलाकार तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार बहुसंख्येने उपस्थित होते.
या दोन्ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुक्रमे पंकज दुखंडे व प्रियांका वेलणकर तर आभार प्रदर्शन गोपाळ रुमडे व हर्षद जोशी यांनी केले. या दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमातून विविध क्षेत्रातील 192 कलाकारांची नोंदणी करण्यात आली आहे.