वेंगुर्ला : स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत मेजर ध्यानचंद स्टेडियम, वेंगुर्ले येथे रविवार २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट व कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. क्रिकेट स्पर्धेत कर्णधार विशाल होडावडेकर यांचा वेंगुर्ला टायगर्स संघ विजेता ठरला तर कर्णधार वैभव म्हाकवेकर यांचा वेंगुर्ला लायन्स संघ उपविजेता ठरला. तर कबड्डी स्पर्धेत श्री. विशाल होडावडेकर यांचा सेव्हन स्टार संघ विजेता ठरला तर कर्णधार श्री. हेमंत चव्हाण यांचा रायझिंग स्टार संघ उपविजेता ठरला.
“स्वच्छता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता) हे अभियान देशभरात दि. १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. नगरपरिषदेने राष्ट्रीय व राज्यस्तरावर विविध मानांकने प्राप्त केलेली असून यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणा-या सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचा-यांसाठी एकदिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सफाई कर्मचा-यांचा उत्साह वाढविणे, त्यांच्या आरोग्य व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे व सर्व कर्मचा-यांमध्ये सामुदायिक एकता आणि संघटन भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. क्रिकेट स्पर्धेत मालिकावीर म्ह्णून मैनुद्दीन धारवाडकर, उत्कृष्ट फलंदाज म्ह्णून वैभव म्हाकवेकर व उत्कृष्ट गोलंदाज म्ह्णून शैलेश सातार्डेकर याना गौरविण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देवून मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून सुधीर सारंग व उदय म्हाडदळकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेदरम्यान माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी भेट देवून सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओंकार गोहर याने वैयक्तिक पारितोषिके प्राप्त केले. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देवून मुख्याधिकारी कंकाळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून जयवंत चुडनाईक यांनी काम पाहिले. या स्पर्धेदरम्यान माजी नगरसेवक उमेश येरम यांनी भेट देवून सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे सर्व नगरपरिषदेचे एक कुटुंब आहे. वेंगुर्ला शहरातील स्वच्छता विषयक सर्व प्रकारची कामे करणा-या कर्मचा-यांच्या आयुष्यामध्ये सुखद व उत्साहवर्धक क्षणांसाठी अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय महत्वाच्या भूमिका बजावतात. या पुढील कालावधीत आपल्या सफाई मित्रांसाठी अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे मत मुख्याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले.