गोरक्षकांच्या निशाण्यावर पशुवैद्यकीय अधिकारी

मुख्यमंत्र्यांसह गोसेवा आयोगाचं वेधलं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 13:35 PM
views 76  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंश याची कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्याचे प्रकार गोरक्षक बांधवांच्या मदतीने वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. यातच देशी गोवंश वाहतूक करण्यासाठी देण्यात येणारे प्रमाणपत्र देताना कुडाळ पशुवैद्यकीय अधिकारी अक्षम्य प्रकारचा गुन्हा करत आहेत. खरेदी विक्री पावती न बघता व्यापारी आणि जनावरांचे दलाल यांच्या सांगण्यावरून खोटे प्रमाणपत्र देत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अकार्यक्षम आणि नियम बाह्य काम करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षक स्वागत नाटेकर यांनी पशू संवर्धन अधिकाऱ्यांकडे केली आहे. याकडे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य गोसेवा आयोग व जिल्हाधिकाऱ्याचेही लक्ष वेधलं आहे. 

नाटेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंश वाहतूक करण्यासाठी देण्यात येणारे प्रमाणपत्र देत असताना कुडाळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांगुले एस एम हे अक्षम्य प्रकारचा गुन्हा करत आहेत. जनावरे वाहतूक करण्यासाठी देण्यात येणार प्रमाण पत्र देताना संबंधित जनावरे खरेदी-विक्री पावती न बघता, प्रत्यक्ष पाहणी करून जनावरांची माहिती न घेता काही व्यापारी आणि जनावरांचे दलाल यांच्या सांगण्यावरून खोटे प्रमाणपत्र देत असल्याचे निदर्शनास आले आहे. सावंतवाडी आंबोली मार्गावर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये गाडी क्रमांक MH 07 P 0589 ह्या गाडीमध्ये असलेल्या जनावरांना टॅगींग केलेलं आढळून आलेले नाही. तसेच गाडी सोबत असलेल्या चालकाकडे दोन टॅग मिळाले. या टॅगवर असलेले क्रमांक आणि गाडी सोबत असलेलं प्रमाणपत्र आणि गाडीत असलेली जनावरे ह्या मध्ये साधर्म्य नाही आहे. गाडीच्या चालकाकडे याबाबत चौकशी केली असता, वैद्यकीय अधिकारी श्री. कांगुले यांनी आपल्याला हे टॅग दिले असे सांगितले. वास्तविक पाहता आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या प्रचलित नियम प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेली प्रमाणपत्रे आणि टॅग केलेले बिल्ले यांची शासकीय प्रणालीवर नोंदणी बघितली असता ते टॅग सुधा शासनाच्या प्रणालीवर आढळून येत नाहीत. त्यामुळे संबंधित जनावरांच्या मालकी बाबत सुधा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशी गोवंश याची कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्याचे प्रकार आम्ही गोरक्षक बांधवांच्या मदतीने वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. पोलीस प्रशासनाच्यावतीने बऱ्याच वेळी कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. अशा परिस्थिती मध्ये अधिकारी वर्गाकडून करण्यात आलेल्या या प्रकारामुळे कित्येक देशी गोवंश कत्तलीसाठी गेल्याचे निदर्शनास आले आहे. 

त्यामुळे अशा अकार्यक्षम आणि नियम बाह्य पद्धतीने काम करणाऱ्या संबंधित वैद्यकिय अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षक स्वागत नाटेकर यांनी पशू संवर्धन अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य गो सेवा आयोग व जिल्हाधिकाऱ्याचेही लक्ष वेधलं आहे. यावेळी गोरक्षक कृष्णा धुळपनवर, श्री‌. सावंत आदी उपस्थित होते ‌