
सिंधुदुर्गनगरी : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता बहु कौशल्यावर आधारित जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी- प्लंबर, मेकॅनिकल फिटर, इलेक्ट्रीशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जल मित्र यांची नेमणूक प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार आहे. 431 ग्रामपंचायतीसाठी किमान 1 हजार 293 बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक विनायक ठाकूर यांनी दिली.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणीद्वारे प्रती मानसी प्रती दिन 55 लि. विहित गुणवत्तेसह दैनंदिन वापरासाठी कार्यान्वित नळाद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. यासाठी लोक सहभागाला अन्यन्य साधारण महत्व देण्यात आलेले आहे. तसेच पाणी पुरवठा योजना पुर्व नियोजन टप्यापासून ते देखभाल व दुरुस्ती टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रीय सहभाग असल्याशिवाय योजना टिकु शकत नाही.
जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती योग्य रितीने व्हावी. याउद्देशाने प्रति ग्रामपंचायत 3 नल जल मित्र यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी- प्लंबर, मेकॅनिकल फ़िटर, इलेक्ट्रोशियन- पंप ऑपरेटर याप्रमाणे प्रत्येक ट्रेडसाठी तीन या प्रमाणे प्रती ग्रामपंचायत 9 उमेदवारांची नाम निर्देशने, संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड व फोटोसह ग्रामपंचायत स्तरावर संपर्क साधण्यात यावा.
ग्रामपंचायतीमार्फत विहित नमुन्यात सादर केलेल्या शिफरस पत्रातील 9 नामनिर्देशित व्यक्तीमधून राज्यस्तरावरुन प्रि-स्क्रींनिग करुन ट्रेडनुसार 3 नाम निर्देशिन अंतिम करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी निश्चित करण्यात आलेला कौशल्य संच पुढीलप्रमाणे आहे. गवंडी- प्लंबर, मेकॅनिकल फ़िटर, इलेक्ट्रीशियन पंप ऑपरेटर या 3 ट्रेडसाठी गावातील अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य देण्यात येणार आहे. सदरचे कौशल्य असलेल्या व्यक्तीस गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. तरी इच्छुकांनी लवकरात लवकर आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन चे प्रकल्प संचालक विनायक ठाकूर यांनी केले आहे.