
मालवण : बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर यांना कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कारने सन्मानित करण्यात आलंय. वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रा. बि. सह. पतसंस्था मर्या. आचरा यांच्यावतीने दिला जाणारा हा पुरस्कार आहे. आचरा इथं बुधवारी 25 सप्टेंबरला संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे चेअरमन मंदार श्रीकांत सांबारी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आलं.
संस्थेचे माजी संस्थापक अध्यक्ष कै. श्रीकांतभाई सांबारी यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी गेल्यावर्षीपासून हा पुरस्कार दिला जातोय. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. मान्यवरांच्या उपस्थित अॅड. देवदत्त परुळेकर यांना सन्मानित करण्यात आलंय.
अॅड. देवदत्त परुळेकर यांनी वयाच्या 40 व्या वर्षी वकिलीची प्रॅक्टीस सोडून समाजकार्यात झोकून दिलं. शालेय जीवनापासूनच त्यांच्यावर समाजवादी विचाराचा प्रभाव आहे. प्रा मधु दंडवते यांचे प्रमुख प्रचारक म्हणून त्यांनी वेंगुर्ला आणि परिसरात काम केले.युवा सहयोग ही संस्था स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. या संस्थेमार्फत त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले व तरुणांना विधायक कामाकडे वळवले. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम त्यांनी जिल्ह्यात अनेक वर्ष केले. स्व नरेंद्र दाभोळकर यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले अनेक धाडसी मोहिमा यशस्वी केल्या.
राष्ट्रसेवादलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगल काम केले. जिल्ह्यात युवक युवतींची अनेक शिबीरे आयोजित करून अनेक राज्यस्तरीय तज्ञांच्या मार्गदर्शनाचा तरुणांना फायदा करून दिला.
बॅ नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द खूपच संस्मरणीय आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात सेवांगणने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. कोरोना काळातही ऑनलाईन उपक्रमाद्वारे सेवांगण कार्यरत राहिले. त्यांच्याच काळात अन्नदान; स्कॉलरशीप वर्ग , NMMS वर्ग, बुद्धीबळ वर्ग, साहित्यिक कार्यक्रम आदी अनेक नवीन कार्यक्रमांची सुरुवात झाली.
अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे . त्यांची स्वतःची समृद्ध लायब्ररी आहे. चित्रपट, नाटक, लोककला, विविध भाषातील साहित्यक आदी विषयावर ते प्रभावीपणे बोलू शकतात. साने गुरुजी विनोबा भावे महात्मा गांधी यांच्याविषयी त्यांचा खूप अभ्यास आहे अन् या महान नेत्यांवर त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.
संत साहित्याचा अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख आहे. मामा दांडेकर दिंडीचे ते प्रमुख आहेत. गेली अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आषाढी एकादशीला ही दिंडी पंढरपूरला जाते. ते उत्कृष्ट वारकरी किर्तन करता. शिवाय कोकणसाद LIVE सुरु असलेल्या संतांच्या गोष्टी या खास कार्यक्रमातून त्यांचे निरुपण ऐकायला मिळतय.