युनेस्को कमिटीच्या समन्वयक शिखा जैन यांनी केली विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 21, 2024 14:16 PM
views 29  views

देवगड  : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग  भेटी दरम्यान विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी व ग्रामस्थांसोबत चर्चा आणि पर्यटन संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार असे युनेस्को कमिटीच्या समन्वयक शिखा जैन यांनी माहिती दिली असून युनेस्को अर्थात जागतिक वारसा स्थळाच्या सदस्यांची टिम महाराष्ट्रातील नामांकन मिळालेल्या १२ किल्ल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येत असून ६ आॅक्टोबर रोजी विजयदुर्ग किल्याची पाहणी केली जाणार आहे. त्यावेळी ग्रामस्थांसोबत चर्चा आणि एकंदर पर्यटन संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाणार आहे. यासाठी विजयदुर्ग ग्रामस्थांनी सज्ज राहणे गरजेचे आहे.अशी माहिती राज्य शासनाच्यावतीने नियुक्त केलेल्या युनेस्को समितीच्या समन्वयक किल्ले संवर्धन वास्तू विशारद शिखा जैन यांनी विजयदुर्ग भेटीदरम्यान येथील ग्रामस्थांना दिली. यावेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, मुंबई सर्कलचे संवर्धन अधिक्षक शुभ मुजुमदार तसेच जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

तसेच यावेळी शासनाच्या वतीने देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. प्रांताधिकारी जगदिश काटकर, देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, देवगड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुरज कांबळे, तलाठी श्री. तानवडे, पोलिस पाटील राकेश पाटील तसेच किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परूळेकर, सचिव बाळा कदम, रविकांत राणे, प्रदीप साखरकर, माजी उपसरपंच महेश बिडये, शिवप्रेमी दिपक करंजे आदी उपस्थित होते.

युनेस्कोच्या विशेष पाहणी दौरा पार्श्वभूमीवर प्राथमिक पाहणी करण्यासाठी श्रीमती जैन यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सर्व अधिकारी वर्गाचे स्वागत सरपंच रियाज काझी तसेच किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी केले. दरम्यान, युनेस्को पाहणी दौरा अंतर्गत युनेस्को सदस्यांशी चर्चा करण्यासाठी विजयदुर्ग बाजारपेठेतील व्यापारी प्रतिनिधी, प्रवासी बोट वाहतूक संघटना प्रतिनिधी, गाईड, महिला बचत गट प्रतिनिधी, सांस्कृतिक कार्यवाहक, प्रेरणोत्सव समिती त्याचप्रमाणे अन्य घटकांची सात सदस्यांची निवड भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या नवी दिल्ली येथील सहाय्यक महासंचालक जान्हवी शर्मा यांनी केली आहे. गठीत केलेल्या या सदस्यांशी व्यक्तीगत चर्चा करण्यात येणार असून इतर ग्रामस्थांशीही फेरफटका मारताना युनेस्कोचे सदस्य कोणत्याही व्यक्तींशी सहज चर्चा करतील असंही शिखा जैन यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, यावेळी विजयदुर्ग ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या विशेष सभेमध्ये मार्गदर्शन करताना किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी सांगितले की, राज्य शासनाने नामांकित केलेले सर्व किल्ले आपलेच आहेत. शिवछत्रपतींनी कुठल्याच किल्ल्याबाबत दुजाभाव केला नाही. परंतु आता आपलं घर जपलं पाहिजे. या दृष्टीने आपण आपला विजयदुर्ग किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात निश्चित व्हावा यासाठी सजग राहणे गरजेचे आहे. 

बारा किल्ल्यांमध्ये एक प्रकारची शर्यत असून आपल्या किल्ल्याचे इतिहास आणि पर्यटकांच्या दृष्टीने किती महत्त्व आहे, या किल्ल्याला भेट देण्यासाठी दरवर्षी किती पर्यटक येतात याची सर्वसाधारण माहिती आपण या सदस्यांना देण्यासाठी नागरिक म्हणून जागृत राहणे गरजेचे आहे. तसेच हा पाहणी दौरा असून युनेस्कोचे सदस्य पाहणी करताना त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यत्यय येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.यासाठी ग्रामस्थांनी हा इव्हेंट नसून हा पाहणी दौरा आहे यादृष्टीने सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आले आहे.