आडाळी एमआयडीसीवर 22ला चर्चात्मक परिसंवाद

Edited by: विनायक गांवस
Published on: September 19, 2024 15:00 PM
views 29  views

सावंतवाडी : आडाळी एमआयडीसी स्थानिक विकास समिती आणि घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग यांच्यावतीने 'आडाळी एमआयडीसी : अपेक्षा आणि वास्तव' या विषयावर चर्चात्मक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात रविवार, 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल. 


आडाळी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राबाबत चाललेल्या दिरंगाईकडे लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राचा प्रकल्प जाहीर केला. ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे स्वागत करून सर्व प्रकारचे सहकार्य करुन 720 एकर जमीन एमआयडीसीला दिली. मात्र गेली दहाहून अधिक वर्षे या औद्योगिक क्षेत्राचे कामकाज वेगवेगळ्या कारणामुळे रखडत आहे. दोडामार्ग तालुका हा निसर्गसंपन्न असला तरी औद्योगिकदृष्ट्या मागास आहे. येथील शेकडो तरुण रोज गोव्यात कामधंद्यासाठी जातात. त्या सर्वांना स्थानिकरित्या रोजगार उपलब्ध होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु अनुभव आणि वास्तव मात्र वेगळे आहे. हे वास्तव सर्वांसमोर आणण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. आडाळी एमआयडीसी स्थानिक विकास समिती आणि घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग ही सेवाभावी संस्था एमआयडीसीचे काम मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मंत्रीमहोदयांच्या, अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, निवेदने, उपोषण, अर्जविनंती, आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लॉन्ग मार्च अशा वेगवेगळ्या स्तरावर या कामाचा पाठपुरावा आम्ही करीत आलो. उद्योगांसाठी सर्व प्रकारची अनुकुलता, उद्योजकांची मागणी असुनही अद्याप पायाभूत सुविधा, भुखंडवाटप यात प्रगती झालेली नाही. जमीन खरेदी करुन आठ वर्षे झाली तरी अद्याप एकही उद्योग आडाळीत सुरु झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सतीश लळीत प्रास्ताविक करून आडाळी एमआयडीसी क्षेत्राच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा सादरीकरणातुन घेतील. यानंतर समितीचे अध्यक्ष व आडाळीचे सरपंच पराग गावकर चर्चासत्राचे बीजभाषण करतील. यानंतर विविध क्षेत्रातील नामवंत वक्ते चर्चेत सहभागी होतील. 

यात कायदेतज्ञ ॲड.  संदीप निंबाळकर, उद्योजक नाना कशाळीकर, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यवाह ॲड.  नकुल पार्सेकर, पत्रकार शिवप्रसाद देसाई, व्यापारी संघटनेचे बांदा येथील पदाधिकारी अभय सातार्डेकर यांचा समावेश आहे. एमआयडीसीच्या रत्नागिरी प्रादेशिक अधिकारी श्रीमती वंदना खरमाळे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. चर्चेचे संचालन गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सई लळीत करतील. आभारप्रदर्शन प्रवीण गावकर करतील.