खोट्या बातम्या पसरवून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

काँग्रेसच्यावतीने पोलिसांना निवेदन
Edited by: दिपेश परब
Published on: September 18, 2024 14:27 PM
views 201  views

वेंगुर्ला : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे आणि इतर व्यक्ती विरोधात खोट्या बातम्या पसरवणे आणि जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा, धार्मिक वैमन्स्य उभे करणे, कटकारस्थान रचणेबाबत प्रथम खबरी अहवाल घेऊन आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँगेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी याबाबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना निवेदन दिले आहे. 

    या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे आणि इतर संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार करत आहे की, संबंधित व्यक्तिंनी त्यांच्या फेसबुक आणि द्विटर आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून कर्नाटक सरकारची खोटी बातमी प्रसारित करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे, मानहानी करणे, शांतता भंग करणे असे अनेक प्रकार केलेले आहेत. या लोकप्रतिनिधीनी खोटी माहिती पसरवून आणि धार्मिक अशांतता निर्माण केलेली आहे. या व्यक्ती महत्त्वाच्या पदावर असून त्यांनी आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्यात गंभीर चुक केली आहे.

  एका वृत्त वहिनीने केलेल्या सत्यता तपासणीत असे स्पष्ट झाले आहे की कर्नाटक सरकारने गणेश पूजा बंद केली आहे किंवा गणेश मूर्ती पोलिसांनी जप्त केल्या आहेत याचा दावा खोटा आहे. प्रसारित केलेल्या प्रतिमा मागील एका विनापरवाना आंदोलनाच्या असून गणेश विसर्जनाशी संबंधित नाहीत. या कृती भारतीय दंडसंहितेच्या विविध तरतुदींचा भंग करतात, ज्यात कलम ३(५), ६१(२), १९६, ३५६ आणि ३५१ (१) (२) (३) यांचा समावेश आहे, ज्यामध्ये मानहानी, वैमन्स्य प्रोत्साहन आणि गुन्हेगारी कट यांचा तपास केला जातो. तरी या कृतीच्या गंभीरतेनुसार, आपणास विनंती करतो की,  सदरील सोशल मीडिया वरील लिंक व खोटी माहिती त्वरित काढून टाकण्यात यावी आणि पुढील प्रसारण थांबवण्यात यावे.  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नितेश राणे आणि इतर संबंधित व्यक्तीविरुद्ध एफ.आय.आर. दाखल करण्यात यावा व त्यांना अटक करण्यात यावी.

त्यांचे वर्तन सार्वजनिक शांतता आणि सामाजिक सौहार्दाला धोका आहे. पुढील प्रसार थांबवण्यासाठी आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्याकरिता, कारण कायद्यासमोर सर्व समान आहेत आपण त्वरित्त गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

   यावेळी यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, माजी नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, सामाजिक न्याय विभागाच्या वेंगुर्ला तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अनुराधा वेर्णेकर, वेगुर्ला तालुका काँग्रेस सरचिटणीस मयूर आरोलकर, आरवली युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश हुनारी, अब्दुल शेख इत्यादी उपस्थित होते.