कंपनीकडून 3 महिन्यांचा पगारच नाही, मनसे आक्रमक

Edited by: विनायक गांवस
Published on: September 18, 2024 08:52 AM
views 408  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील एका नामांकित कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांचे 3 महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही. तसेच काही कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचा पीएफही देण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले धनादेशही बाउन्स झालेत. कंपनीने या 210 कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पीएफ सात दिवसात न दिल्यास कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी दिला आहे.


अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांनी मनसेच्या केसरकर यांची भेट घेतली. या कर्मचाऱ्यांसमवेत केसरकर यांनी सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष अँड. राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, राहुल जांबरेकर आणि कर्मचारी उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ही कंपनी आली होती. त्यामुळे केसरकर यांनी या अन्यायाबाबत लक्ष घातले पाहिजे. स्थानिक पातळीवर युवकांना रोजगार देऊ शकत नाही, मग जर्मनीला पाठवून रोजगार काय देणार ? या युवकांचे भवितव्य काय घडवणार असा सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी केला आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावरील अन्यायाचा पाढा वाचला.