वेंगुर्ला : तालुक्यातील तुळस येथे १४ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य मार्गावर जैतीर मंदिर नजीक कृष्णा नावाची खासगी बस मुंबई येथे प्रवाशांना घेऊन जात असताना अपघात झाला. दरम्यान ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने ही बस शेजारील शेतात कोसळली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले याबाबत वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करूनही हा रस्ता रुंदीकरण केला जात नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या बस अपघातात एकूण ११ प्रवासी जखमी झाले होते. तर सुदैवाने कोणालाही जीवितहानी झाली नाही. ही अपघातग्रस्त बस श्री देव जैतीर मंदिर येथून प्रवाशांना घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जात असताना दोन्ही बाजूला भातशेती असलेल्या अरुंद रस्त्यावर आली असता समोरून येणाऱ्या रिक्षाला साईड देण्यासाठी बस चालकाने गाडी साईडपट्टीवर उतरवली. याचवेळी ही बस जास्तच बाहेर गेल्याने बाजूच्या शेतात कोसळली. हा रस्ता अरुंद असून याला पुरेशी साईडपट्टी नाही. दोन मोठ्या बस एकचवेळी या रस्त्यावरून जाऊ शकत नाहीत. हा अरुंद रस्ता सावंतवाडी वेंगुर्ला मुख्य मार्गावर असल्याने याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. याबाबत तुळस ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कालवून सुद्धा यावर लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.