रामेश्वर भजन मंडळाचे हरिनामासोबत सामाजिक कार्य

Edited by: दिपेश परब
Published on: September 11, 2024 14:11 PM
views 241  views

वेंगुर्ला : ऊन आणि पाऊस यांचा सामना करत गणेशोत्सव कालावधीत बंदोबस्ताच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी सेवा बजाविणा-या पोलिस व होमगार्ड यांच्या कार्याची दखल घेत वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर भजन मंडळातर्फे त्यांना पाणी व बिस्किट यांचे वाटप करण्यात आले. हरिनामासोबतच रामेश्वर भजन मंडळाने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल पोलिसांतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. 

 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक कोंडी होऊ नये तसेच उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी, विसर्जनावेळी भाविकांना त्रास होऊ नये यासाठी वेंगुर्ला शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आपल्या घरात गणपती असूनही उत्सव कालावधीत नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, वाहतुक कोंडी होऊ नये, गणपती विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ‘खाकी वर्दी‘ म्हणजेच पोलिस विभाग कार्यरत आहेत. ऊन, पाऊस, वारा यांची तमा न बाळगता आपल्या सेवेसी प्रामाणिक राहून उत्सव चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी सहकार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर भजन मंडळाचे ज्येष्ठ बुवा विजय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळातील अन्य भजनी कलाकारांनी वेंगुर्ला शहरात ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या पोलिस व होमगार्ड कर्मचारी यांना पाणी व बिस्किटाचे वाटप केले.


      यावेळी रामेश्वर भजन मंडळाचे सदस्य शेखर भगत, मंदार भगत, दुर्गेश भगत, सोहम भगत, मनोज पांगम, रामकृष्ण कुडतरकर, राहूल मोर्डेकर, राजेश तुळसकर, हितेश सावंत, सुषेन बोवलेकर, गणपत वेंगुर्लेकर, स्वरीत वेंगुर्लेकर, महादेव मेस्त्री, निखिल घोटगे, भैय्या गुरव, प्रियांशू भगत, जीवन तुळसकर आणि भूषण गोकरणकर आदी उपस्थित होते.