
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीला जे.जे मेडिकलचे मालक उमेश कालकुंद्रेकर यांनी वृद्ध वयस्कर रुग्णांना वॉकर तसेच ब्लडप्रेशरची यंत्र भेट दिली. यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी त्यांचे आभार मानले. तर रूग्णालयाला मंदीर समजून भेट स्वरूपात रूग्णोपयोगी वस्तू द्या असं आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, ही भेट म्हणजे गोरगरीब रुग्णांचा आशीर्वाद मिळेल. शासकीय रुग्णालय हे आपले मंदिर मानून सर्वांनी मदत केल्यास गोरगरीब रुग्णांचा आशीर्वाद मिळू शकतो. कुटुंबातील व्यक्तींच्या वाढदिवस तसेच लग्नाच्या वाढदिवस अशावेळी सर्व नागरिकांनी रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात भेट वस्तू दिल्यास त्याचा फायदा सर्व रुग्णांना होईल. मंदिरात जाऊन जेवढे पुण्य मिळत नाही तेवढे पुण्य आपल्या पदरी यातून पडू शकते. छोट्या आरोग्य केंद्रांना आपल्या मदतीची गरज असते. सर्व रुग्णांना शासनामार्फत मिळते त्यासाठी पाठपुरावा करून जिल्ह्याच्या ठिकाणी ही मागणी करण्यासाठी बराच वेळ होतो. यासाठी छोटी छोटी मदत आपल्या मित्र मंडळ तर्फे तसेच गावागावात असलेली मंडळे विविध पक्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवस गणेश उत्सव नवरात्र उत्सव अशाच साठी सुद्धा अनेक जण पैसा खर्च करत असतात. बॅनर जाहिराती या सर्व गोष्टीनीवरील 25% पैसा आपल्या असलेल्या जिल्ह्यातील रुग्णालयाला आरोग्य केंद्राला मदत केल्यास वस्तू स्वरूपात दिल्यास याचा फायदा रुग्णालयाला होऊ शकतो असं ते म्हणाले.