
सावंतवाडी : परप्रांतीय लोकं कामाच्या शोधामध्ये सिंधुदुर्गात येतात, मिळेल ते काम करतात. परंतु, कामाच्या ठिकाणी आपल्या लहान मुलांना कुठेही कसेही रस्त्यावर खेळायला सोडून देतात. त्यांच्या निष्काळजीपणामुळे कित्येक लहान मुलांचा दुर्दैवी बळी गेले आहेत. सामाजिक बांधिलकीच्या सपना असनीकर यांच्या सतर्कतेमुळे सावंतवाडीत एका छोट्याला जीवदान मिळाले.
पाषाण काळजाचे काही परप्रांतीय माता- पिता अवघ्या दहा ते वीस हजार रुपयांमध्ये सेटलमेंट करून गावी निघून जातात. काही दिवसानंतर प्रकरण थंड झाले की पुन्हा कामावर रुजू होतात. अशीच घटना सावंतवाडीत घडणार असती. मात्र, सुदैवाने ही घटना टळली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची सपना असनियेकर बांदा येथे जात असताना इन्सुली लाटीच्या पुढे दोन वर्षाचं लहान मूल हायवेच्या मध्यभागी रडत उभ असताना तिने पाहिल. त्यानंतर जागीच स्कुटी थांबवून त्या मुलाकडे धाव घेतली. मुलाला हायवेच्या बाजूला आणलं. त्या मुलाच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. ते मोठमोठ्याने रडत होतं. त्यानंतर लोकांची गर्दी जमली व त्या मुलाच्या आई-वडिलांचा शोध सुरू झाला.
जवळपास अर्ध्या तासानंतर या मुलाचे आई-वडील त्याठिकाणी आले. संतप्त नागरिकांनी त्या मुलाच्या वडिलांना जाब विचारला. हा प्रकार पोलिसांच्या कानी घातला. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन त्या इसमाला समज दिली. असे प्रकार वारंवार होत असतात त्यामुळे पोलिसांनी ठेकेदार व अशा निष्काळजी वृत्तीच्या आई-वडिलांवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव यांनी केली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची सपना असनीकर हिच्या सतर्कतेमुळे फार मोठा अनर्थ टळला. त्यासाठी जमलेल्या नागरिकांकडून तिचे कौतुक करून आभार मानण्यात आले.