सावंतवाडी : कोकणवासीयांचा सण म्हणजे गणेशोत्सव. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू असून चतुर्थीच्या बाजारासाठी सावंतवाडी बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केली. तालुक्यातील शेकडो लोक चतुर्थीच्या बाजारासाठी सावंतवाडी बाजारात आलेत. माटोळीसाठी लागणारे सामान मोठ्या प्रमाणात बाजारात पहायला मिळाले.
सोनेरी हरण, कवंडाळांसह माटोळीसाठीच सामान घेण्यासाठी गणेशभक्त बाजारपेठ दाखल झाले. सजावटीच सामान, कापड, फळ, धुप अगरबत्ती, मिठाई दुकान, इलेक्ट्रॉनिक दुकानं यानिमित्ताने सजलेली दिसून आली.अवघ्या दोन दिवसावर गणेश चतुर्थीच सण असताना लाडक्या बाप्पासाठी लागणारे सामान, माटोळी सामान घेण्यासाठी बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातून महिला वर्ग नारळ,केळी सुपारी, व इतर जंगली सामान सामान मोठ्या प्रमाणात बाजारत घेऊन आलेत. मुसळधार पावसामुळे मोठा फटका बाजारपेठेवर दिसला. विशेषतः किराणा दुकान, सजावटीच्या दूकानांस फटाक्यांची दुकाने गर्दीने भरून गेली. चाकरमानी दाखल झाल्याने मोठी आर्थिक उलाढाल या तिन दिवसांत शहरात होणार आहे.
वाहतूक पोलीसांवर प्रचंड ताण
गर्दी व गाड्यांची वर्दळ आटोक्यात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी कडक बंदोबस्त केला. ठीक ठिकाणी पोलीस व होमगार्ड लावले आहे. मात्र, कमी मनुष्यबळाचा फटका पोलिस विभागाला बसला. वाहतूक कोंडी होऊन ट्राफिक जाम झाले. केवळ सात ते आठ वाहतूक पोलीस तैनात होते. त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. वाहतूक पोलीसांकडून ही कोंडी सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. सायंकाळी वाहतूक सुरळीत चालू होती.
सावंतवाडी बॅनरमय
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर बॅनरमय झाले होते. नजर जाईल तिथे, जागा दिसेल तिथे राजकीय पुढाऱ्यांनी बॅनरबाजी केली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजप नेते विशाल परब, युवा नेते संदीप गावडे यांनी बॅनर लावण्यात आघाडी घेतली. सर्वपक्षीयांचे बॅनर शहरात दिसून आले. पक्षफुटीनंतर पडलेल्या गटांमुळे बॅनरांच्या संख्येत अधिकच वाढ झालेली दिसून आली..