वैभववाडी : करूळ बौध्दवाडी नजीक महावितरणच्या डीपीवर झाडाची फांदी कोसळली.ही घटना आज (ता.५)दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे अर्ध्या गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. उशीरापर्यंत दुरुस्तीसाठी महावितरणे कर्मचारी न आल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. आजही पावसाच्या सरी कोसळत होत्या. आज दुपारी वादळासहीत झालेल्या पावसामुळे करुळ बौध्दवाडी नजीक आंब्याची फांदी महावितरणच्या डीपीवर कोसळली. यात वीज खांब, वीज वाहिन्या व डीपीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजता घडली. यामुळे गावातील वीजपुरवठा पूर्णता खंडित झाला आहे. ही घटना होऊन सायंकाळी उशिरापर्यंत देखील वीज वितरणचे कर्मचारी दुरुस्तीसाठी न आल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. ऐन चतुर्थीत विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गणपती सजावटीच्या कामे खोळंबली.महावितरणे तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.