सावंतवाडी : कोलगाव येथील बेपत्ता युवक अक्षय जनार्दन साईल (वय २८ ) याचा मृतदेह माडखोल येथील धरणात गुरुवारी सकाळी आढळून आला. मंगळवारपासून तो बेपत्ता होता. बुधवारी सकाळी त्याची दुचाकी आणि चप्पल माडखोल धरणालगत आढळून आले. त्यानं आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.
माडखोल धरणात बुडाल्याचा अथवा आत्महत्या केल्याचे तर्कवितर्क लावले जात होते. संशय बळावल्यान सावंतवाडी पोलिसांच्या उपस्थितीत बाबल आल्मेडा रेस्क्यू टीमच्या सहाय्याने सायंकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती. सायंकाळी ही शोध मोहीम थांबविण्यात आली. दरम्यान, गुरुवार सकाळी माडखोल धरणात एक मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला.अधिक तपास केला असता तो मृतदेह कोलगाव येथील बेपत्ता असलेल्या अक्षय साईल याचाच असल्याचे उघड झाले.
घरातील आढळलेल्या चिठ्ठीबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली नसून नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या चिठ्ठीमध्ये संबधित युवकाने आपण जानेवारी महिन्यामध्ये माझ्या ओळखीने मित्राला चार चाकी गाडी भाड्याने दिली होती. त्या गाडीचा अपघात झाल्यानंतर गाडीच्या नुकसान भरपाई साठी संबंधित गाडी मालकाने माझ्याकडे पैशाचा तगादा लावला होता. त्याला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याने आपण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले असल्याचे सांगितले. शिवाय माझ्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या सर्वांना त्यांच्या पापाची शिक्षा द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. चिट्टीमध्ये 9 जणांची नावे मोबाईल नंबरही आहेत. काहींची नावे अर्धवट आहेत. चिठ्ठीतील पैशाचे कारण पाहता युवकाने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.