
कुडाळ : मागच्या अनेक दिवसांपासून नारुर गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.२२ रोजी) ओरोस येथील वीज खात्याच्या कार्यालयात जाऊन उप अभियंता राजेंद्र कामथे यांना घेराव घालून आंदोलन छेडण्यात इशारा दिला होता. त्यानंतर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेची दखल घेऊन वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने नारुर गावात नवीन ट्रान्सफॉरर्मर बसवला. दरम्यान वीज खात्याने तातडीने ट्रान्सफॉरर्मर बसवल्याने नारुर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी ओरोस येथील वीज खात्याच्या कार्यालयात जाऊन उप अभियंता राजेंद्र कामथे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. तसेच वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. तशा आशयाचे निवेदन सादर केले. यावेळी नारुरचे उपसरपंच मुकुंद सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य विजय मयेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश सरनोबत, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ सरनोबत, किशोर सरनोबत उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेची दखल घेऊन उप अभियंता राजेंद्र कामथे यांनी तातडीने नारुर गावात नवीन ट्रान्सफॉरर्मर बसवण्याच्या सूचना दिल्या. तसेच यापुढे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची ग्वाही दिली. त्यानंतर तातडीने नारुर येथे कर्मचारी पाठवून नवीन ट्रान्सफॉरर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत केला.
दरम्यान, वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन नवीन ट्रान्सफॉरर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.