
सावंतवाडी : मळेवाड परिसरात चिरेखाणीवर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराची ६ वर्षांची मुलगी डंपर खाली चिरडून ठार झाली. हे प्रकरण दडपण्याच्या इराद्याने मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला होता. त्यांनतर या कुटुंबाला आपल्या गावी पाठवले होते. या भयंकर प्रकाराबद्दल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
मळेवाड येथे एका चिरेखाणीत परप्रांतीय कुटुंब कामावर होतं. यावेळी त्यांची ६ वर्षांची मुलगी डंपर खाली चिरडली गेल्यावर तीचा मृत्यू झाला. तो प्रकार डंपर चालक, चिरेखाण मालकाने मिटवण्यासाठी मृतदेह दफन केला. या प्रकरणी कारवाई होईल म्हणून परप्रांतीय कुटुंबाला पैसे देऊन परत आपल्या गावी पाठवल्याचे समजले. प्राथमिक चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला माहीती मिळताच आम्ही अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परप्रांतीय कुटुंबाला बोलावून मृतदेहाच घटनास्थळ शोधून काढून पुढील कारवाई करणार अशी माहीती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.