
सावंतवाडी : मोती तलावात आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह पाण्यावर तरंगला. तब्बल दहा तास शोधमोहीम राबवून देखील त्यात यश आलं नव्हते. मंगळवारी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. हा मृतदेह शहरातील व्यापारी व राजकीय कार्यकर्ते राकेश नेवगी यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
सावंतवाडी पोलिसांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह तलावातून बाहेर काढला. या मृतदेहाची ओळख पटली असून राकेश सुर्यकांत नेवगी (४२, रा. वैश्यवाडा सावंतवाडी ) असे त्यांचे नाव आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या नातेवाईकांनी याबाबतची खात्री केली असून पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. राकेश नेवगी हे मनमिळावू असं व्यक्तिमत्त्व होते. लोकसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे असं ते आवर्जून सांगत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते पदाधिकारी होते. मध्यंतरीच्या काळात राजकारणापासून ते अलिप्त होते. मात्र, सोमवारी अचानकच नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी आपलं जीवन संपवले. त्यांच्या निर्णामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक आनंद नेवगी यांचे ते चुलत बंधू होत. त्यांच्या जाण्याने नेवगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर तलावात उडी घेणारा नेहमी हसतमुख असणारा राकेश होता हे समजल्यानंतर सावंतवाडी देखील हळहळ व्यक्त होत आहे.