
वेंगुर्ला : तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांचा क्रीडा व युवा सेवा संचालनालय, सिंधुदुर्ग च्या जिल्हा युवा पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालय च्या वतीने जिल्हा स्तरावर असंघटित युवक युवतींना संघटित करून त्यांच्या सुप्त कलागुणांना संधी देऊन सामाजिक क्षेत्राबरोबर कला , क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देत समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. २०२०-२१ या वर्षाचा जिल्हा युवा पुरस्कार विवेक तिरोडकर यांना प्रदान करून यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याचा सन्मान करण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी येथिल पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमा दरम्यान पुरस्कार वितरण समारंभा वेळी क्रीडा व युवा सेवा संचालनालय सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तिरोडकर यांना सन्मानपत्र व रोख रक्कम १००००/- प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस आदी मान्यवर उपस्थित होते.
विवेक तिरोडकर यांनी पुरस्कार म्हणजे केवळ गौरव नसून समाजाप्रति काम करण्याची प्रेरणा व जबाबदारी असल्याचे सांगत भविष्यात वेताळ प्रतिष्ठाच्या माध्यमातून समाजासाठी अधिकाधिक काम करण्यासाठी प्रयत्न करीन असे सांगितले तर पुरस्कार स्वरूपात मिळालेली रोख रक्कम १००००/- रुपये वेताळ प्रतिष्ठानला देणगी स्वरूपात देऊन पुरस्काराच्या रकमेचा विविध सामाजिक उपक्रमासाठी वापर कारण्यात येतील असे सांगितले.