
दोडामार्ग : उसप येथील बापूसाहेब देसाई विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक महिंद्र अविनाश खांडेकर सर यांची आविष्कार फौंडेशन इंडिया ( कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य ) या संस्थेच्या 2024 च्या "राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्काराने " नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
आविष्कार फौंडेशन इंडिया ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला, वैद्यकीय, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित करते. पुणे येथे हा पुरस्कार नुकताच सचिन वायकुळे संचालक स्मार्ट भाषण कला अकॅडेमी बार्शी जि. सोलापूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक सुरेश पाटोळे, कर्मवीरायण चित्रपटाचे डायरेक्टर धनंजय भावलेकर, चाटे शिक्षण समूह पुणे संचालक फुलचंद चाटे, मास्टर ट्रेनर यशदा पुणेचे विवेक गुरव , मुख्य आयोजक संजय पवार संस्थापक अविष्कार फौंडेशन निमंत्रक प्रकाश चौधरी, यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले.
खांडेकर सर हे गेली १७ वर्षे विज्ञान आणि गणित विषयाचे अध्यापन करत आहेत. ते ११ वर्षे सहाय्यक शिक्षक व ०६ वर्ष प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कुशल सेवा तथा उत्तम प्रशासक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. सन १९८६ -८७ साली महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट शिस्तबद्ध सुव्यवस्थापीत माध्यमिक शाळा म्हणून 5 शिक्षक कार्यरत असताना बापूसाहेब देसाई विद्यालय उसप प्रशालेचा गौरव करण्यात आलेल्या प्रशालेचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यभार केवळ 01 शिक्षक यांच्या साथीने स्वीकारणे हे खूप आव्हानात्मक काम होते. पण तेही आव्हान त्यांनी लिलया पेलले. गेली 05 वर्षे सलग माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा 100 % निकाल देणारी शाळा म्हणून ओळखली जाते. शासकीय रेखाकला प्रमाणपत्र परीक्षेचा प्रशालेचा सलग 100 % निकाल. एन. एन. एम. एस. परीक्षेत यशस्वी सहभाग, विज्ञान मेळावा, विज्ञान नाटिका, विज्ञान प्रदर्शना अंतर्गत मॉडेल निर्मिती, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात वर्किंग मॉडेल निर्मितीत प्रशालेचा यशस्वी सहभाग आहे. सदर सहभागी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांच्या साथीने एक कुशल मार्गदर्शक म्हणून श्री. खांडेकर सरांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रात सरांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली असून ते दोडामार्ग तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
सर्वांच्या सहकार्यानेच यश
हा पुरस्कार माझ्या उसप पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ उसप यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी पालक वर्ग, शिक्षण प्रेमी, जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती सिंधुदुर्ग मित्र परिवार,दोडामार्ग तालुका मुख्याध्यापक संघ, दोडामार्ग शिक्षक वर्ग यांच्या सांघिक नियोजनात्मक मार्गदर्शनाचे फलीत आहे. आपण निमित्त मात्र आहोत अशी प्रतिक्रिया पुरस्कार विजेते श्री. खांडेकर यांनी दिली आहे.
मुख्याध्यापक खांडेकर यांचे उसप पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था अध्यक्ष चंद्रकांत मळीक, सचिव लक्ष्मण नाईक, उपाध्यक्ष रामकृष्ण गवस, खजिनदार प्रदीप गवस, कार्यकारिणी संचालक संतोष केरकर, दशरथ मोरजकर, सुभाष परब , अजित कळणेकर, वासू नाईक, उदय गवस, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती यांसह आजी - माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.