
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी शाखा वेंगुर्ले मधील आर्थिक व अनियमितते बाबत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती संघटना यांच्यावतीने पथपेढीचे मुख्य शाखाधिकारी याना निवेदन देत प्राथमिक शिक्षक पतपेढी वेंगुर्ला शाखेचे संपूर्ण संचालक मंडळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सन २०२२ ते २०२४ या कालावधीत वेंगुर्ले शाखेत आर्थिक अनियमितता घडल्याचे दिसते. या कालावधीत शाखा संचालक, संस्था यांचे सचिव, संगणक तज्ञ व संस्थेने नेमलेले हिशेब तपासनीस यांनी लेखापरीक्षण करत असतानाही एवढी अनियमितता असणे अत्यंत गंभीर बाब आहे. या अनियमिततेचा विचार केल्यास संचालक मंडळ यांचा अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे असल्याने ही आर्थिक अनियमितता असल्याचे जाणवते.
शिवाय संस्था संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच प्रणाली वापरत असून अनियमितता केवळ वेंगुर्ला शाखेत झाली असल्याच्या माहितीमुळे आमचा संचालक मंडळ वेंगुर्ला यांच्यावरील विश्वास पूर्णता उडालेला आहे. यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करता आपणाकडून संपूर्ण संचालक मंडळ रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. तसेच वेंगुर्ला शाखेतील सर्व तत्कालीन व विद्यमान मालक सभासदांची विशेष सभा लावून आमच्या याबाबत शंकांचे पूर्ण निरसन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष तेजस बांदिवडेकर, सचिव दिपेश परब, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष सागर कानजी, सचिव अमोल आडके, मालक सभासद जानू पाटील, दीपक वेंगुर्लेकर, श्री.पुरळकर, अर्चना चव्हाण, प्रसाद गावडे आदी उपस्थित होते.