
वेंगुर्ले : शिक्षणाने विद्यार्थी सज्ञान होतो पण छंद विद्यार्थ्याला आकार देत असतात, त्यांना घडवत असतात. आता तर शिक्षण कौशल्याभिमुख असेल तर त्याला प्राधान्य दिले जाते. कुठल्याही प्रसंगात तोंड देण्यासाठी अंगभूत कौशल्य हे नेहमीच उपयोगी पडते परंतु त्याची जाणीव करून देण्यासाठी छंद वर्ग नेहमीच उपयुक्त ठरत असतात. सध्या मोबाईल मध्ये अडकलेल्या नवीन
पिढीला मोबाईल बघू नका, हे करू नका ते करू नका असं सांगण्यापेक्षा एक कृतीशील उपक्रम राबवावा असे ठरले आणि छंद वर्गाचा शुभारंभ १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी होत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. या उपक्रमामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना एक दिशा मिळेल असा विश्वास जे जे स्कूलचे माजी प्राध्यापक सुनील नांदोस्कर यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद शाळा भटवाडी नंबर दोन मध्ये ग्रामस्थांच्या पुढाकाराने छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे ,या छंद वर्गाच्या शुभारंभ प्रसंगी हे छंद वर्ग घेण्यामागचा उद्देश सुनील नांदोस्कर यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर तज्ज्ञ मार्गदर्शन प्राध्यापक प्रदीप प्रभू, सुनील कांबळी, वैभव परब, आत्माराम बागलकर गुरुजी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चैतन्य म्हापणकर उपस्थित होते.
सदर छंद वर्ग भटवाडी शाळा क्रमांक दोन मध्ये दररोज संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत भरणार आहेत. सोमवार - संस्कृत संस्कार वर्ग मार्गदर्शक श्री बागलकर गुरुजी, मंगळवार- चित्रकला वर्ग मार्गदर्शक प्राध्यापक सुनील नांदोस्कर, गुरुवार - बुद्धिबळ वर्ग मार्गदर्शक प्राध्यापक प्रदीप प्रभू, शुक्रवार - इंग्रजी संभाषण वर्ग मार्गदर्शक श्री सुनील कांबळी, शनिवार - तबला आणि हार्मोनियम वर्ग मार्गदर्शक श्री वैभव परब यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
लहान वयात मुलांची आकलन शक्ती आणि कुतूहल अधिक असल्यामुळे जेवढं ज्ञान आपण मुलांना देऊ त्यावर त्यांची जडणघडण अवलंबून असते. त्यांचा कल नेमका कुठे आहे हेही आपल्याला आजमावणं त्यामुळे शक्य होतं. गरज असते ती ज्ञान उपलब्ध करून देण्याची. चारित्र्याचा विकास हेच खरे शिक्षण हे ओळखून वेंगुर्ला भटवाडी शाळा नंबर २ मध्ये विविध कलागुणांच्या छंद वर्गाचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम आहे. असे मार्गदर्शक प्रदीप प्रभू यांनी व्यक्त केले.
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, मुलांच्या विकासासाठी मराठी माध्यमाचे महत्त्व पालकांना कळावे, शालेय शिक्षणाशिवाय कला, क्रीडा, वाचन इत्यादी मधून मुलांचे ज्ञान वाढावे आणि सक्षम विद्यार्थी घडावा यासाठी भटवाडी ग्रामस्थांच्या पुढाकाराने ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरू केलेला हा उपक्रम नक्की मुलांना योग्य दिशा देईन असे मत मार्गदर्शक बागलकर गुरुजींनी व्यक्त केले.
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जाऊनही मुलांना इंग्रजी व्यावहारिक जीवनात वापर करता येते असे नाही. मराठी माध्यमातील ही शाळा इंग्रजी संभाषण उत्तम व्हावे यासाठी करत असलेला हा उपक्रम खरंच मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. मुलांच्या मनातील न्यूनगंड आणि इंग्रजी भाषेची भीती यामुळे निश्चितच कमी होऊन मुलं आत्मविश्वासपूर्वक इंग्रजी संभाषण करतील असा विश्वास मार्गदर्शक सुनील कांबळी यांनी व्यक्त केला.
पोटापाण्याचा उद्योग हा तुम्हाला जगवेल, पण कलेशी मैत्री ही माणसाला का जगायचं हे सांगून जाते असे पु ल देशपांडे यांनी म्हटलेलेच आहे. हे लक्षात घेऊन एक तरी कला आपण आत्मसात केल्याने आपल्या जीवनात नक्कीच आनंद निर्माण होईल. आणि हा आनंद भटवाडी शाळा नंबर दोनच्या स्तुत्य उपक्रमातून आपल्याला मिळत आहे याचा जास्तीत जास्त मुलांनी लाभ घ्यावा असेही आवाहन मार्गदर्शक वैभव परब यांनी केले.
सदर शाळेत सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे छंद वर्ग विनामूल्य असून इतरांसाठी अत्यल्प फी आकारलेली आहे. या छंद वर्गासाठी वयाची अट नाही. या छंद वर्गाचा शुभारंभ भारताच्या स्वातंत्र्यदिनी दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी डॉक्टर राजन शिरसाट ,विद्याधर सावळ , उद्योजक परशुराम वारंग, प्रवीण सातार्डेकर नवनाथ सातार्डेकर, विशाल सावळ, रवींद्र शिरसाट ,संजय पटेल ,अनिल आठलेकर, नित्यानंद आठलेकर , नारायण बर्वे गुरुजी , अशोक पेडणेकर ,भटवाडी बाल गणेश मंडळाचे सर्व सदस्य ,शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छंद वर्गात प्रवेश मर्यादित असून लवकरात लवकर ईच्छुकांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे निवेदन माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.