
कुडाळ : महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे,या उद्देशाने शासनाने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू केली आहे. या योजनेचा महिलांनी लाभ घेऊन आप-आपल्या क्षेत्रात प्रगती साधावी व भविष्यात योजनांवर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वावर उभे राहावे असे आवाहन कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी केले.
कुडाळ येथील तहसील कार्यालयात महसुल पंधरावडा कार्यक्रमाचा शुभारंभ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रातांधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच आतापर्यंत प्राप्त प्रस्तावांची तपासणी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कुडाळ नायब तहसिलदार संजय गवस, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.चव्हाण, नायब तहसिलदार प्रदिप पवार, श्री. पिळणकर, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी गीता चेंदवणकर, कुडाळ न.पं.चे मुख्याधिकारी अरविंद नातु, सखी वन्स स्टॉप सेंटरच्या रुपाली प्रभु, अक्षय कानविंदे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी श्रीमती काळुशे म्हणाल्या की, प्रत्येकाचा महसूल विभागाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो. तुमची सर्वांची साथ असेल तर निश्चितच आमचा महसूल विभाग अप्रतिम काम करेल. आता मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू होणार आहे. अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. दि. 31 ऑगस्टपर्यत अधिकाधिक महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी आमची सर्व यंत्रणा काम करत राहणार आहे. महिलांनी आतापासूनच स्वतःच्या प्रगतीसाठी काम करा. स्वतः सक्षम व्हा. प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. प्रशासन आणि आमचे निश्चितच तुम्हाला कायम सहकार्य राहिल. असा विश्वास श्रीमती काळुशे यांनी उपस्थित महिला भगिनीं समोर व्यक्त केला.
सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी या योजनेबाबत पंचायत समिती प्रशासन कार्यरत असल्याचे सांगून अधिकाधिक महिलांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या अक्षय कानविंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. दरम्यान येत्या पंधरावड्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय,कृषी मार्गदर्शन कार्यक्रम,शेती पाऊस आणि दाखले,युवा संवाद, महसूल इ प्रणाली आदि विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले. यावेळी स्वप्नाली सावंत,रसिका बांबुळकर या दोन युवतींना प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटप प्रांताधिकारी श्रीमती काळुशे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन व आभार अव्वल कारकुन नरेश ऐडगे यांनी मानले.