
सावंतवाडी : पावसाळा सुरु झाल्यापासून सातोसे व मडूरा भागात सातत्याने वीज सेवा खंडित होत आहे. अनेक रात्री काळोखात काढाव्या लागत आहेत. खंडित वीज सेवेचा नळयोजनेवर परिणाम झाला आहे. या सर्व समस्येने त्रस्त झालेल्या सातोसे व मडूरा ग्रामस्थांनी सावंतवाडी वीज कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी वीज अधिकाऱ्यांनी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे समस्या होत असल्याचे उत्तर दिले. यावर ग्रामस्थ आक्रमक झाले. तुम्ही कारणे सांगू नका, वीज सेवा सुरळीत करा अशा शब्दात माजी सरपंच बबन सातोस्कर यांनी ठणकावले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकाऱ्याने नरमाईचे घेत तत्काळ समस्या दूर करण्याची ग्वाही दिली. मडूरा उपसरपंच बाळु गावडे यांनी मडूरा गावातील वीज समस्यांचा पाढा वाचला. कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे व अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळेच समस्या वाढल्या असल्याचे सांगितले.
रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, माजी सरपंच वसंत धुरी आदींनी समस्या मांडल्या. यावेळी सातोसे उपसरपंच रुपेश साळगांवकर, माजी सरपंच एकनाथ भगत, प्रसाद मांजरेकर,काशिनाथ पेडणेकर, सुभाष पेडणेकर, भगवान रेडकर, भरत पेडणेकर, रघुनाथ पेडणेकर, लक्ष्मण जाधव, लवू मांजरेकर, बाबी धुरी, साळगांवकर आदी उपस्थित होते.