
चिपळूण : मा. विभागिय सहनिबंधक, सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी संघ मर्या. अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने प्रथमच देण्यात येणारा कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार एकत्रित व्यवसाय २०० ते ५०० कोटी गटात श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला नुकताच जाहीर झाला असून हा पुरस्कार दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी अलिबाग येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी दिली.
सन २००२ मध्ये श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली असून श्री. प्रभाकर आरेकर यांचे मार्गदर्शनाखाली मागील २२ वर्षे संस्थेने नियोजनबद्ध कामकाज केले आहे. संस्थेच्या कोकण विभाग कार्यक्षेत्रात १८ शाखा व ०२ कलेक्शन सेंटर कार्यरत असून रत्नागिरी जिल्ह्यातील विश्वासार्ह पतसंस्था म्हणून नाव लौकिक प्राप्त केला आहे. संस्थेच्या दि. ३१ जानेवारी २०२५ अखेर एकूण ठेवी रू.२०४ कोटी १० लाख, एकूण कर्ज व्यवहार रू. १६९ कोटी ४६ लाख वसूल भागभांडवल रू.१२ कोटी ८३ लाख, निधी रू.१७ कोटी ४७ लाख, गुंतवणुक रू. ७२ कोटी ७० लाख, एकूण नफा रू. १४ कोटी ५४ लाख व संमिश्र व्यवयाय रू. ३७३ कोटी ५६ लाख असून संस्थेच्या कर्ज थकबाकीचे प्रमाण अत्यल्प
आहे. तसेच संस्थेने एनपीओचे प्रमाण शून्य टक्के राखलेले आहे. संस्थेला स्थापनेपासून ऑडीट वर्ग अ असून संस्थेने सभासदांना मार्च २०२४ अखेर १५ टक्के लाभांश दिलेला आहे. संस्थेकडून ठेवीदारांना आकर्षक व्याजदर देण्यात येत असून सभासदांना सुलभपणे कर्ज वितरण करण्यात येत आहे. संस्थेने कामकाज करताना पारदर्शकता, विश्वासार्हता, सुरक्षितता व व्यावसायिकता या चार तत्वांचा अवलंब केला असून संस्थेच्या सभासद, ठेवीदार व ग्राहक यांना चांगल्याप्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न संस्थेकडून करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री प्रभाकर आरेकर व संचालक मंडळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.