मुलांशी सुसंवाद साधायला हवा : अँड. नकुल पार्सेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: July 16, 2024 10:28 AM
views 187  views

सावंतवाडी : समाज माध्यम आणि मोबाईलचा अतिरेकी वापर व दुरुपयोग यामुळे शाळा, महाविद्यालये यामध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्याबाबतीत अनेक समस्या निर्माण झाल्यात. यामुळे पालक त्रस्त आहेत. पण, याचा विपरीत परिणाम आपल्याला सामाजिक स्वास्थ्यावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. फास्ट फूड, फास्ट मनी यामुळे अगदी पंधरा सोळा वर्षाच्या वयोगटातील मुलं क्षणिक मोहापायी दिशाहीन बनत आहे. धूम स्टाईलने गाड्या चालवणे, गुटखा खाणे, ड्रग्जच्या आहारी जाणे अशा गोष्टीत गुरफटलेली ही तरुण मुलं जर योग्य मार्गावर आणायची असतील तर पालकांनी सजगपणे आपल्या पाल्यांकडे लक्ष देवून त्यांच्याशी योग्यवेळीचं सुसंवाद साधला पाहिजे असं मत सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सेकर यांनी व्यक्त केल. बांदा हायस्कूल व बांदा ज्युनियर काॅलेजमध्ये आयोजित केलेल्या पालकांसाठीच्या कार्यशाळेत अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पार्सेकर बोलत होते. 


ते पुढे म्हणाले, शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षकांचीही जबाबदारी आता वाढली आहे. शाळेतील मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात प्रत्येकाचं जीवन अतिशय गतिमान झालेलं आहे. आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नाही. त्यामुळे अगदी सहजपणे व्यक्त होण्यासाठी हल्ली मुलं त्यांना हवा तो भावनिक कोपरा शोधत असतात. अशावेळी त्यांच्याशी आपलं भावनिक नातं घट्ट करण्याची आवश्यकता आहे असं मत व्यक्त केले.

  

सुरूवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकिशोर नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात पालकांसाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेचा उद्देश विशद केला. यावेळी अटल प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक श्रीमती अर्पिता वाटवे यांनी उपस्थित महिलानां वयात येणाऱ्या मुलींच्या बाबतीत त्यांच्या मातानी  कोणत्या प्रकारे दक्षता घेतली पाहिजे तसेच आपली मुलगी किंवा मुलगा कोठे जातो ? काय करतो ? याबाबत सजग असणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक श्रीमती तृप्ती धुरी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला उपस्थित माता-पालकानी उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रशालेच्या सह शिक्षिका  रश्मी नाईक यानी मानले.